टाटांचे उत्तराधिकारी नोएल टाटा, टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती

उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र टाटा ट्रस्टला नवा अध्यक्ष मिळाला असून रतन टाटा यांचे सावत्र भाऊ 67 वर्षीय नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाची मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विश्वस्तांनी एकमताने रतन टाटा यांचे भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला.

टाटा समूहाच्या दोन सर्वात मोठय़ा धर्मादाय संस्था सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट यांच्या प्रमुखपदी आता नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आली असून नोएल टाटा हे यापूर्वी या दोन्ही संस्थांचे विश्वस्त म्हणून कार्यरत होते. आता ते या संस्थांचा संपूर्ण कारभार पाहणार आहेत. टाटा ट्रस्टकडे टाटा सन्सची तब्बल 66 टक्के भागीदारी असून टाटा समूह टाटा ट्रस्टद्वारे चालवला जातो. टाटा ट्रस्ट धर्मादाय उपक्रम आणि प्रशासनावर देखरेख ठेवण्याचे काम पाहते.

माझ्यावर जी जबाबदारी सोपविण्यात आली आहे त्याबद्दल मी प्रचंड आभारी आहे. मी रतन नवल टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा विकासाचा आणि परोपकाराचा वारसा पुढे अविरत सुरू ठेवण्यासाठी तत्पर आहे. टाटा ट्रस्ट सामाजिक कार्य करण्याचे माध्यम असून राष्ट्र उभारणीत आम्ही महत्त्वाची भूमिका बजावू. – नोएल टाटा