आता राहुल गांधींना कोणीही पप्पू म्हणू शकत नाही; शरद पवार यांनी सुनावले

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या कामगिरीमुळे भाजपचे चांगलेच डोळे उघडले आहेत. इंडिया आघाडीची एकजूट दाखवत महाविकास आघाडीने 48 पैकी 30 जागा जिंकून महायुतीचा धुव्वा उडवला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबतीत एक वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता राहुल गांधी यांना कोणीही पप्पू म्हणू शकत नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

एका पत्रकार परिषदे दरम्यान लोकसभेच्या निकालाबाबत सांगताना शरद पवार म्हणाले, राहुल गांधी यांची निवड विरोधी पक्षनेता म्हणून झाली ही चांगली गोष्ट आहे. त्यांच्या पक्षाकडे संख्याबळ देखील जास्त आहे, तसेच तरूण पिढीचे प्रतिनिधीत्व करण्याकरीता राहुल गांधी यांची निवड योग्य असल्याचे पवार यांनी सांगितले. यापूर्वी राहुल गांधींबद्दल जो काही अपप्रचार करण्यात येत होता तो त्यांनी खोटा ठरवला. त्यामुळे या पुढे त्यांना कोणीही पप्पू म्हणणार नाही, असा टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला.

महाराष्ट्रातील जनतेने फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्या भाजपला आणि सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्या मिंधे गटाला हिसका दाखवला. महाविकास आघाडी आता आगामी विधानसभा निवडणुकीकरीता सज्ज असून जनता विधानसभा निवडणुकीत देखील योग्य तो कौल लावून देशातील व राज्यातील दडपशाहीला संपवेल हे स्पष्ट झाले आहे. वारंवार गॅरंटी देऊनही मोदींना जनतेने टाळले. त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीकरीता नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, असा टोला ही पवार यांनी लगावला.