Ratnagiri News : 996 शिक्षकांची भरती होऊनही रत्नागिरी जिल्ह्यात 22 शाळा शून्य शिक्षकी

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 996 शिक्षकांची भरती होऊनही 22 शाळा या शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत. शिक्षक भरती होऊनही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 हजार 63 शिक्षकांची पदे रिक्त आहेत. 22 शाळा शून्यशिक्षकी ठरल्यामुळे नुकतीच झालेली शिक्षक भरतीही अपुरी ठरली आहे. शून्यशिक्षकी शाळांमध्ये दुसऱ्या शाळेतील शिक्षक पाठवताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्यामुळे गतवर्षीच रत्नागिरी जिल्ह्यात शून्यशिक्षकी शाळांचा प्रश्न निर्माण झाला होता. विद्यार्थी आहेत पण गुरुजी नाहीत अशी अवस्था अनेक शाळांमध्ये झाली होती. त्यावेळी कंत्राटी पद्धतीने मानधनावर काही शिक्षक भरण्यात आले. त्यावेळी रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षक भरती करण्याची मागणी झाली होती.

अलिकडेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 996 शिक्षकांची भरती करण्यात आली होती. पहिली ते पाचवीपर्यंत 714 उपशिक्षक भरण्यात आले. सहावी ते आठवीपर्यंत 230 पदवीधर शिक्षक भरण्यात आले. आणि उर्दूचे 58 शिक्षक भरण्यात आले. ही भरती होऊनही जिल्ह्यात 1 हजार 63 शिक्षकांची पदे रिक्त राहिली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजापूरात सर्वाधिक 8 शून्यशिक्षकी शाळा

शिक्षकांची भरती होऊनही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तब्बल 22 शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक 8 शून्यशिक्षकी शाळा राजापूर तालुक्यात आहेत. रत्नागिरी तालुक्यात 5 शाळा, संगमेश्वरमध्ये 3 शाळा, मंडणगडमध्ये 2 शाळा तसेच चिपळूण, दापोली, गुहागर आणि खेड तालुक्यात प्रत्येकी 1 शाळा शून्यशिक्षकी शाळा ठरल्या आहेत. या शाळांमध्ये दोन शिक्षक आहेत. त्यातील एक शिक्षक शून्यशिक्षकी शाळेत पाठवताना शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागली आहे. जिल्ह्यामध्ये एकशिक्षकी शाळांची संख्याही वाढली आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जावरही परिणाम होत आहे.