70 बेकायदा शाळांवर कारवाईची छडी नाहीच; ठाण्यातील 20 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

बेकायदा शाळांमध्ये कोणीही प्रवेश घेऊ नये, असे आवाहन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने दरवर्षी केले जाते. तसे यंदाही केले. एवढेच नव्हे तर पालिका क्षेत्रात तब्बल 70 बेकायदा शाळा असल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. त्याची यादीच प्रसिद्ध केली. अशा अनधिकृत शाळा चालवणाऱ्या संचालकांविरोधात त्वरित गुन्हे दाखल करावेत यासाठी शिक्षण विभागाने पोलिसांना वारंवार पत्रे पाठवली. पण बेकायदा शाळांवर कारवाईची छडी उगारण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली असून कोणावरही गुन्हे दाखल केले नाहीत. त्यामुळे 20 हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून पालकही चिंताग्रस्त झाले आहेत.

ठाणे महानगरपालिका हद्दीतील बेकायदा शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यास आळा बसावा यासाठी मेस्टा संघटनेने पुढाकार घेऊन ठाणे विभागाकडे पुराव्यांसह तक्रार केली. बेकायदेशीर सुरू असलेल्या काही शाळांवर १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता तर काही शिक्षण विभागाच्या कारवाईला धाब्यावर बसवून मुजोर संचालकांनी पुन्हा ७० शाळा उभारल्या आहेत. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी आणखी शाळांची नव्याने भर पडली असून सर्वात जास्त बेकायदा शाळा दिव्यात सुरू आहेत. लवकरात लवकर बेकायदा शाळा बंद करून भ्रष्ट अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी मेस्टा संघटनेने केली आहे.

पोलीस म्हणतात तरतूदच नाही
पालिकेच्या शिक्षण विभागाने कळवा, डायघर, मुंब्रा आणि राबोडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मागील आठवड्यात बेकायदा शाळा चालवणाऱ्या संचालकांवर गुन्हा दाखल करावा, असे पात्र पाठवले आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान बेकायदा शाळेवर गुन्हा दाखल करण्याची तरतूदच नसल्याने अजब उत्तर पोलिसांनी दिल्याने शिक्षण विभागातील अधिकारी संभ्रमावस्थेत आहेत.