मरण पत्करेन पण भाजपसोबत जाणार नाही म्हणणारे नितीश कुमार पुन्हा कमळाबाईला शरण

मरण पत्करेन पण पुन्हा भाजपसोबत जाणार नाही असा पण करणारे नितीश कुमार पलटी मारून कमळाबाईला शरण गेले आहेत. राष्ट्रीय जनता दलाशी काडीमोड घेत नितीश यांनी आज सकाळी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लागलीच भाजपने नितीश यांच्या जदयुला पाठिंबा दिला. सायंकाळी पाच वाजता नितीश यांनी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सरकारही स्थापन केले. एकाच टर्ममध्ये तीन वेळा त्यांनी पलटी मारली तर आठवेळा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा आणि नऊ वेळा बिहारचे मुख्यमंत्रीपद असा सत्तेचा खेळही मांडला. या घडामोडींनंतर विरोधी पक्षांनी ‘बिहारचे पलटूराम’ अशी खिल्ली उडवत नितीश यांच्यावर तोफ डागली.

नितीश यांच्या सरकारमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा असे भाजपचे दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत. नितीश यांच्यासह नऊजणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात जीतनराम मांझी यांच्या पक्षालाही स्थान मिळाले. मांझी यांचे पुत्र संतोष कुमार सुमन यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. अपक्ष सुमीत सिंह यांनाही मंत्रीपद देऊन खूश करण्यात आले. बिहारमध्ये गेल्या दोन वर्षांपासून महाआघाडीच्या रूपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डावे सत्तेत होते. मात्र ही आघाडी त्यांनी आज सकाळी संपुष्टात आणत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. यानंतर लगेच संध्याकाळी त्यांनी भाजपच्या एनडीए आघाडीच्या पाठबळावर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्याकडून नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

शपथ घेताना नितीशकडून ‘जय श्री राम’चा जयघोष

आजवर भाजपच्या धर्माधिष्ठाrत राजकारणाला झोडपणाऱ्या नितीश यांनी राज्यपाल आर्लेकर यांच्याकडून शपथ घेताना ‘जय श्री राम’च्या घोषणा देत राज्यातील सत्तापालटाबरोबर त्यांचेही विचार पालटल्याचीच जणू साक्ष दिली.

शशी थरूर यांना आठवला ‘स्नोलिगोस्टर’ शब्द

शशी थरूर यांनीही 2017 मधील ट्विट पुन्हा शेअर केले. तेव्हा त्यांनी, स्नोलिगोस्टर हा शब्द अशा नेत्यांसाठी वापरला जातो, ज्यांना लोकांची सेवा करण्यापेक्षा आपल्या वैयक्तिक फायद्याची जास्त काळजी असते, असे म्हटले होते.

तेजस्वी यादव यांचे धाकटे बंधू आणि माजी पर्यटन मंत्री तेज प्रताप यादव यांनीदेखील नितीश कुमार यांना सरडय़ाची उपमा दिली. सरडा उगाच बदनाम आहे. रंग बदलण्याचा वेग पाहता ‘पलटिस कुमार’लाही एका गिरगिट रत्न पुरस्काराने सन्मानित करायला हवे, असे ते म्हणाले.

लालू यांच्या कन्या रोहिणी आचार्य यांनीही नितीश यांची कचऱ्याशी तुलना केली. “कचरा पुन्हा कचरापुंडीत गेला. कचराकुंडी मंडळाला दुर्गंधीदायक कचरा लखलाभ…’’ असे त्यांनी म्हटले आहे.

नितीशकुमारांचा पक्ष संपेल

तेजस्वी यादव यांनी नितीशकुमार यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. नितीश यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातली जनताच उत्तर देईल. त्यांच्याकडे कसलेच व्हिजन नव्हते. ते थकले होते. एका थकलेल्या मुख्यमंत्र्याकडून आम्ही खूप काम करून घेतले. आम्ही संयमाने युती धर्म निभावला आहे; परंतु आता खरा खेळ सुरू झाला आहे. मी सांगतोय ते लिहून घ्या. जदयु हा पक्ष 2024 च्या निवडणुकीनंतर राजकारणातून नाहीसा होईल, असे ते म्हणाले.

देशात असे अनेक आयाराम-गयाराम

देशात नितीश कुमार यांच्यासारखे अनेक आयाराम गयाराम आहेत. नीतीश पलटी मारणार आहेत हे आम्हाला माहीत होतं. नितीश यांनी इंडियाशी नाते तोडले असले तरी आम्ही एकसंधपणे लढणार, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

पंधरा दिवसांत असे काय झाले?

भाजपला नियंत्रणात ठेवणे गरजेचे असून त्यासाठी विरोधकांची एकजूट करावी, असे नितीश कुमार सांगत होते. मात्र मागच्या 15 दिवसांत अचानक काय झाले, याची कल्पना नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली.

भाजपचे राजकारण हा लोकशाहीला मोठा धोका

भाजपचे राजकारण हाच लोकशाहीला मोठा धोका आहे. नितीशकुमार यांचे सध्या मानसिक संतुलन बिघडलेले आहे, ते व्यवस्थित झाले की पुन्हा आमच्याकडे येतील. इंडिया आघाडी भक्कम आहे असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.