निशिगंधा आपटेंनी पोलिसांना टीप दिली आणि लपाछपीचा खेळ संपला; बायकोनेच जयदीप आपटेचा गेम केला

मालवणच्या राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर 15 दिवस फरार असलेला शिल्पकार जयदीप आपटे याला अखेर कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी बुधवारी रात्री जेरबंद केले. आपटेला अटक करण्यामागील इनसाईड स्टोरी आता समोर आली आहे. आपटेची पत्नी निशिगंधा यांनीच त्याचा गेम केला. बायकोने पोलिसांना टीप दिली आणि जयदीपचा लपाछपीचा खेळ संपला. आई आणि बायको मुलाला भेटण्यासाठी घरी आल्यानंतर पोलिसांनी बिल्डिंगच्या गेटवरूनच त्याला उचलले. त्याला अटक केल्यामुळे पुतळा दुर्घटनेमागील सत्य बाहेर येण्यास मदत होणार आहे.

26 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे फरार होता. आपटेने अत्यंत निकृष्ट दर्जाचे शिल्पकाम केले. गुन्हा दाखल केल्यापासून मालवण पोलीस, कल्याण ग्रामीण आणि ठाणे पोलिसांची पाच पथके जयदीप आपटेचा शोध घेत होती, परंतु जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला नव्हता. पोलीस सातत्याने त्याची पत्नी निशिगंधाच्या संपर्कात होते. फरार जयदीप आपटे याने त्याच्या पत्नीशी संपर्क करून बुधवारी रात्री घरी येत असल्याचे सांगितले. त्यानंतर निशिगंधा यांनीच जयदीप घरी येत असल्याचे पोलिसांना सांगितले. जयदीपने घरी परत यावे आणि तपासात सहकार्य करावे, अशी त्याच्या पत्नीची इच्छा होती. निशिगंधा यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून बुधवारी रात्री सवादहा वाजता त्याला अटक केली.

अटकेचा घटनाक्रम
– जयदीप आपटे हा कसाऱ्यावरून लोकल ट्रेनने कल्याण रेल्वे स्थानकात आला.
– कल्याणला उतरल्यावर जयदीप रिक्षा करून दूधनाका परिसरात उतरला.
– जयदीपने डोक्यावर टोपी घातली होती आणि तोंडाला मास्क लावला होता.
– हातात दोन बॅगा होत्या. तो कल्याण पश्चिमच्या दूधनाका परिसरातील गुप्ते चौकातील स्वामीनारायण हौसिंग सोसायटीतील घरी निघाला.
– इमारतीमध्ये संशयास्पदरीत्या शिरत असताना प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या पोलिसांना संशय आला.
– इमारतीमध्ये जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे ओळखपत्र पाहिल्याशिवाय पोलीस कोणत्याही रहिवाशांना इमारतीमध्ये सोडत नव्हते.
– जयदीपला अडवून पोलिसांनी ओळखपत्र मागताच त्याचे अवसान गळाले. भेदरलेल्या अवस्थेत तो रडायला लागला.
– पोलिसांनी ताब्यात घेऊन लगेचच त्याला डीसीपी कार्यालयात आणले. तेथे सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात त्याला देण्यात आले.