लालबागमध्ये मद्यधुंद प्रवाशामुळे ‘बेस्ट’ने नऊ जणांना उडवले, एका तरुणीचा मृत्यू

मद्यधुंद प्रवाशाने थांबा नसलेल्या ठिकाणी बस थांबवण्यासाठी चालकासोबत वाद घालत थेट स्टेअरिंग पकडून बाचाबाची केल्याने झालेल्या अपघातात नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. लालबागमध्ये घडलेल्या या दुर्घटनेत एक महिलेचा दुर्दैवी नाहक मृत्यू झाला. तर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने नऊ प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेनंतर संबंधित मद्यपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई सुरू असल्याचे ‘बेस्ट’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

लालबागमध्ये गजबजलेल्या परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास मार्ग क्रमांक 66 वरून बस जात असताना गणेश सिनेमागृहाजवळ बस आल्यावर एका मद्यपी प्रवाशाने बसचालकाशी वाद घातला. या ठिकाणी थांबा नसताना बस थांबण्यासाठी तो दबाव आणू लागला. हा वाद वाढत गेला आणि मद्यपी चालकाच्या अंगावर जात त्याला स्टेअरिंगवरून खेचले. या गोंधळात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून बसने नऊ पादचाऱयांना धडक दिली. ही दुर्घटना रविवारी रात्री 8.20 वाजताच्या दरम्यान घडली. सर्व जखमींना महापालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. त्यापैकी श्रेया सुभाष मणियार आणि नूपुर सुभाष मणियार (27) या गंभीर जखमी झाल्या. नूपुर मणियार यांच्या छाती तसेच पोटाला गंभीर जखमा झाल्या. त्यांना तात्काळ केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविल्यानंतर मध्यरात्री बाराच्या सुमारास मृत घोषित करण्यात आल्याची माहिती बेस्टकडून प्रशासनाने दिली. काळाकिल्ला आगाराच्या सेवेत असलेली ही बस ओलेक्ट्रा कंपनीकडून भाडेतत्त्वार घेण्यात आली आहे. भाटिया बाग येथून निघालेली ही बस राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात होती. या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या मद्यपी प्रवाशी दत्ता शिंदे याला काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

असा घडला अपघात

रविवारी रात्री 8.20 वाजण्याच्या सुमारास बेस्टची 66 क्रमांकाची बस गणेश सिनेमानजीक आली. यावेळी बसमधील एका मद्यपी प्रवाशाने बसवाहक तसेच चालकाशी वाद घातला. हा वाद सुरू असताना अचानक या प्रवाशाने बस चालकाला स्टेअरिंगवरून बाजूला खेचले. या गोंधळात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने नऊ पादचाऱयांना धडक दिली. यातील गंभीर जखमींपैकी एका महिलेचा केईएम रुग्णालयात मध्यरात्री मृत्यू झाला.