येत्या 13 तारखेला होणारी लोकसभेची निवडणूक कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायत निवडणूकीप्रमाणे लढवावी. आपल्याला मोठ्या मताधिक्क्याने विजय संपादन करायचा असल्याचे नीलेश लंके यांनी सांगितले.
लंके यांच्या प्रचारार्थ चिचोंडी पाटील येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेत लंके हे बोलत होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, मा. आमदार साहेबराव दरेकर, घनश्याम शेलार, बाबासाहेब गुंजाळ, संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ, शरद झोडगे, गोविंद मोकाते, शौकत तांबोळी, राजेंद्र भगत, रोहिदास कर्डीले, अरूण म्हस्के, राजेश परकाळे, विद्याताई गाडेकर, आबासाहेब कोकाटे, अप्पासाहेब पवार, शंकरराव पवार, महादेव खडके, ययाती फिसके, दिलीप पवार, शरद गुंजाळ, प्रविण कोकाटे यांच्यासह यावेळी मोठया संख्येने नागरीक उपस्थित होते.
यावेळी बोलताना लंके म्हणाले, धनशक्ती विरूध्द जनशक्ती अशी ही निवडणूक असून ही निवडणूक जनतेनेच हाती घेतलेली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मताधिक्क्यासाठी चढाओढ सुरू असून विरोधकांनी शिर्षस्थ नेत्यांच्या कितीही सभा घेतल्या तरी ते आपला विजय रोखू शकत नाहीत. पाच वर्षापूर्वी ज्यांना आपण संसदेत पाठविले त्यांनी विकासाच्या केवळ गप्पा मारल्या. विकास कामे काय केले हे सांगण्यासाठी काही नसल्याने त्यांनी डाळ आणि साखर वाटपाचा फंडा काढला, मात्र त्यांना रोषाला सामोरे जावे लागले. शेतकरी वर्गाने त्यांना कांदा, दुधाच्या पडलेल्या भावाबद्दल जाब विचारला. साकळाई योजना पूर्ण केली नाही तर उमेदवारी करणार नाही असे सांगणारे सुजय विखे हे अर्ज दाखल करून आता कोणत्या तोंडाने मते मागत आहेत? असा सवाल लंके यांनी केला. यावेळी सरपंच शरद पवार यांनी व्हिडीओद्वारे ग्रामस्थांशी संवाद साधला.
विरोधकांकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न
विरोधकांनी जुन्या कारणावरून माझी गावबंदी केली आहे. नीलेश लंके यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून गावागावांमधील नागरीकांकडून त्यांच्याशी संवाद साधण्याची मागणी करीत होते. त्यामुळे चिचोंडी पाटील येथे सभा घेण्यात आली. कोरोना संकटात गावातील कुसूम पटेकर यांचा स्कोअर अधिक असल्याने त्यांना घरी घेऊन जाण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिला होता. आपण नीलेश लंके यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांनी जिल्हा रूग्णालयात फोन करून बेड उपलब्ध करून दिले. तिथे उपचार घेऊन ही महिला घरी पोहचली. खोटया गुन्हयात अडकवून सत्तर ते ऐंशी पोलीसांना पाठवून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मतदार मतपेटीतून त्यास चोख उत्तर देतील.