मराठा समाजाच्या प्रश्नांचा भडिमार; आमदार कल्याणकरांनी काढला पळ

स्वार्थासाठी पक्ष बदलता, निवडून आल्यानंतर विधानसभेत मराठा समाजासंदर्भात काय आवाज उठविला? समाजाला न्याय का दिला नाही? अशा संतप्त प्रश्नांची सरबत्तीच गद्दार आमदार बालाजी कल्याणकर यांच्यावर निळा गावातील मराठा समाजबांधवांनी केली. प्रश्नांच्या भडिमाराला कुठलेही उत्तर न देता आमदारांनी आज पळ काढला. या घटनेची चर्चा तालुकाभर होत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी आमदार बालाजी कल्याणकर व त्यांचे समर्थक निळा गावात आले होते. यावेळी निवडणुकीत उभा राहणार असल्याचे सांगून केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली व निवडून देण्याचे आवाहन केले. या पोपटपंचीने संतापलेल्या निळावासीयांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला.

मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा सुरू ठेवला असून, आमचा माणूस मनोज जरांगे पाटील आहे. तो म्हणेल तसेच होणार, कुणाला पाडायचे व कुणाला निवडून द्यायचे हे जरांगे यांच्या आदेशानुसारच ठरणार, तुम्ही समाजासाठी काय केले? अशा अनेक प्रश्नांनी त्यांना भंडावून सोडले. यावर कुठलेही उत्तर न देता बालाजी कल्याणकर यांनी निळा गावातून काढता पाय घेतला.