छत्रपती संभाजीनगर, जालन्यात एनआयएचे छापे! तीन जणांना ताब्यात, जैश ए मोहंमदशी संबंध असल्याचा संशय

शनिवारी पहाटे 2 वाजता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे एटीएसच्या मदतीने छापेमारी करून  कश्मीर कनेक्शन आणि जैश ए मोहमंद अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून तीन जणांना ताब्यात घेतले. त्यापैकी एक जालना येथील असून दोघे छत्रपती संभाजीनगरमधील असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान दोघांना चौकशी करून सोडून देण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरात महिनाभरापूर्वी टेरर फंडीग प्रकरणात एनआयएने चौकशी केली होती. त्यानंतर शहरातील काही मोहल्ल्यांवर एटीएसकडून पाळत ठेवण्यात आली. तीन दिवसांपासून किराडपुरा, कटकटगेट भागातही एनआयएने खबरे पेरले होते. आज पहाटे किराडपुरा परिसरातील एका घरावर छापा टाकून मौलाना इलियास याला ताब्यात घेण्यात आले. मौलाना इलियास हा पदवीधर असून मदरशात शिक्षक आहे. त्याचबरोबर सिडको एन६ भागातून मौलाना सत्तार यालाही ताब्यात घेण्यात आले. इलियास आणि सत्तार या दोघांची सहा तास कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर या दोघांनाही सोडून देण्यात आले.

एनआयए आणि एटीएसचे पथक तीन दिवसांपासून जालना शहरात तळ ठोकून होते. चमडाबाजार भागातील एका घरावर या पथकाने पाळत ठेवली होती. माहितीची खातरजमा होताच शुक्रवारी पहाटेच एनआयए आणि एटीएसच्या पथकांनी त्या घरावर छापेमारी करून अब्दुल नदीम अब्दुल समद सौदागर या तरुणाला ताब्यात घेतले. प्रत्यक्ष कारवाईच्या वेळी चमडाबाजारमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नदीमला चौकशीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती.

कोण आहे अब्दुल नदीम

एनआयएने ताब्यात घेतलेला अब्दुल नदीम सौदागर हा चमडाबाजार येथील रहिवासी असून त्याचा चामडे आणि भंगारचा व्यवसाय आहे. हैदराबाद येथे त्याचे सातत्याने जाणेयेणे आहे. नदीम हा जैश ए मोहमंद या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली.