जालना, संभाजीनगरमध्ये NIA, ATS ची धडक कारवाई, दोघांना घेतले ताब्यात; जैश-ए-मोहम्मदशी संबंध असल्याचा संशय

महाराष्ट्रात सणउत्सवांना सुरुवात झाली आहे. सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. तसेच विधानासभा निवडणुकीचाही महोल आहे. अशातच मराठवाड्यात जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील वेगवेगळ्या भागात एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेचे पथक व एटीएसच्या पथकाने आज 5 ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मोठी कारवाई केली आहे. एनआयएने दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

देश-विरोधी कृत्यांमध्ये सहभागी असल्याच्या कारणावरून एनआयएने ही कारवाई केली आहे. दोन्ही पथक पहाटेच शहरात दाखल झाले आणि धडक करवाई करण्यात आली. यामध्ये शेख नदीम समद सौदागर यास ताब्यात घेण्यात आले असून जैशे-ए-मोहम्मद संघटनेचे सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी गांधीनगर भागामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्येही एनआयएची कारवाई

छत्रपती संभाजीनगरमध्येही शहरातील वेगवेगळ्या भागात राष्ट्रीय तपास एजन्सीच्या (एनआयए) पथकाने छापेमारी सुरू केली आहे. या पथकाने काहीजणांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे. राज्यात एनआयएच्या पथकाने एकाच वेळी छापेमारी सुरू केली आहे.

छत्रपती संभाजीनगरातील आझाद चौक परिसरात पथकाने रात्री उशिरा छापेमारी सुरू करत काही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या कारवाई किती जणांची चौकशी केली याबाबत माहिती देण्यास पथकाने नकार दिला आहे. रात्री एक वाजेनंतर सुरू केलेली ही कारवाई सकाळी नऊ पर्यंत सुरू होती. या कारवाईत स्थानिक एटीएस पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा देखील समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.