नेवासा फाटा मार्गावर विचित्र अपघातात एक जण ठार

नेवासा ते नेवासा फाटा रोडवर संभाजीनगर जवळ रुग्णवाहिका व अर्टिगा व दुचाकीच्या अपघातामध्ये खलाल पिंपरी येथील तरुण दुचाकीस्वाराचे निधन झाले आहे.

मयत गणेश चंद्रकांत कोरेकर हा टेलरिंगचे काम करीत होता. दुपारी बारा वाजता नेवासा येथील साईराज टेलरचे मालक गणेश चंद्रकांत कोरेकर (38) हे त्यांच्या प्लॅटिना एमएच 17 ए वाय 3857 या दुचाकी वर नेवासा फाट्याकडे जात असताना रुग्णवाहिका व अर्टिगा यांच्यासह झालेल्या विचित्र तिहेरी अपघातात गणेश कोरेकर हे गंभीर जखमी झाले.

त्यांना नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णात दाखल करण्यात आले. नंतर नगर येथे पुढील उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच निधन झाल्याची माहिती पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष धोत्रे यांनी दिली. दरम्यान रात्री उशिरा कोरेकर यांच्यावर खलाल पिंपरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. नेवासा शहरातील औदुंबर चौकात साईराज टेलर हे दुकान ते चालवत होते. त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा एक लहान मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष धोत्रे हे करीत आहेत.