नवीन ठाणे स्टेशनला 170 झोपड्यांचा अडथळा; पुढील आठवड्यात सर्वेक्षण

नवीन ठाणे रेल्वे स्थानकाला झोपडपट्ट्यांचा अडथळा असल्याने कामाला गती मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. स्थानकाच्या आड येणाऱ्या तब्बल 170 झोपड्यांच्या सर्वेक्षणाला पुन्हा पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार असून योग्य ठिकाणी पुनर्वसन होणार का, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. दरम्यान पुनर्वसनानंतरच कामाला गती मिळणार असून या प्रकल्पाचा खर्चदेखील 64 कोटींनी वाढला आहे, तर नव्या स्टेशनला 2026 उजाडणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकामधून दररोज आठ लाख प्रवासी प्रवास करतात. ठाणे स्थानकावरील हा भार कमी करण्यासाठी ठाणे ते मुलुंडदरम्यान नवीन रेल्वे स्थानकाचे काम रेल्वे आणि ठाणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.

2018 पासून या प्रकल्पाला सुरुवात झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे यांनी वेळोवेळी योग्य तो पाठपुरावा केल्यानंतर नवीन ठाणे स्टेशनचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे.

दरम्यान या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल, असा दावा करण्यात आला होता. मात्र आता या प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी आणखी दोन वर्षे लागणार असल्याचा दावा पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

प्रकल्पाचे फायदे काय?
– या स्थानकामधून मुंबईला जाणाऱ्या गाड्या नवीन प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत. तसेच कर्जत- कल्याणच्या दिशेला जाणाऱ्या गाड्या दोन व तीन प्लॅटफॉर्मवरून सुटणार आहेत.

– ठाणे स्थानकातील सुमारे 31 टक्के आणि मुलुंड स्थानकातील 21 टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे.

– नवीन स्टेशनमुळे वागळे इस्टेट, घोडबंदर रोड, मुलुंडमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

खर्च 327 कोटींवर
संपूर्ण प्रकल्पात 3.77 एकर जमिनीवर रेल्वे काम करणार असून 10 एकरवर ठाणे महापालिका काम करणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च 327 कोटींचा असून यामध्ये ठाणे महापालिका 142 कोटी तर रेल्वेकडून 185 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. 2018 साली या प्रकल्पाचा खर्च हा 263 कोटी अपेक्षित धरण्यात आला होता. मात्र आता यामध्ये 64 कोटींची वाढ झाली असून हा खर्च 327 कोटींवर गेला आहे.