नेरुळच्या निधी बारमध्ये छम छम, 18 बारबालांसह 24 जणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या

डान्सबारवर कायद्याने बंदी असली तरी नवी मुंबईतील अनेक लेडीज बारमध्ये चोरी छुपके छम छम सुरूच आहे. नेरुळ येथील सेक्टर 1 मध्ये शिरवणे गावात असलेल्या निधी स्टार गोल्डन बारवर पोलिसांनी छापा मारून 18 बारबालांसह 24 जणांच्या मुसक्या आवळल्या. कारवाई झाली तेव्हा या सर्व बारबाला ग्राहकांशी अश्लील चाळे करताना आढळून आल्या. निधी बारवर झालेल्या या धडक कारवाईमुळे चोरून डान्सबार चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नवी मुंबईत शिरवणे गाव हे बारवाले आणि बारबालांचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे गावात रात्री तळीरामांची जत्रेप्रमाणे गर्दी असते. याच गावातील निधी गोल्डन बारमध्ये बारबालांची छम छम सुरू आहे, अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजकिरण कोलते यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविवारी रात्री 10 वाजता या बारवर छापा मारला. त्यावेळी त्या ठिकाणी 18 बारबाला विचित्र अंगविक्षेप करून ग्राहकांशी अश्लील चाळे करीत होत्या. पोलिसांनी या सर्वच बारबालांसह हॉटेलचा मालक विशाल केवट (19), सुजलकुमार केवट (19), नीरजकुमार वर्मा (19), रोशनकुमार केसरी (18), संजय साह (33) आणि धीरज राय (32) यांना अटक केली. याप्रकरणी नेरुळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर कटपाळे पुढील तपास करीत आहेत.

कारवाई फक्त थातूरमातूर

बारबाला आणि बारवाल्यांमुळे शिरवणे गावातील रहिवासी हैराण झाले आहेत. पोलिसांची कारवाई ही फक्त तू रडल्यासारखे कर मी मारल्यासारखे करतो अशा स्वरूपाची आहे. निधी बारप्रकरणी कारवाई केलेल्या सहा मुख्य आरोपींपैकी चार जण हे 19 वर्षे वयोगटातील आहेत. जे खरे आरोपी आहेत त्यांना पोलिसांनी पाठीशी घातले आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही बारमध्ये असा अश्लील हैदोस सुरूच राहतो, अशी खंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपविभागप्रमुख श्रीकांत भोईर यांनी व्यक्त केली आहे.