NEET UG Scam : नीट घोटाळ्याची चौकशी सुरु असतानाच रातोरात मुंबईतील समुपदेशन केंद्र गायब

देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट युजी (NEET UG) परीक्षा घोटाळ्याचा सध्या सीबीआयकडून तपास सुरू आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत या प्रकरणी संबंधितांची कसून चौकशी सुरु आहे. हे प्रकरण सुरु असतानाच मुंबईतील अंधेरी परिसरातील नीट युजी (NEET UG) समुपदेशन केंद्र रातोरात बंद करण्यात आले आहे. कार्यालयातील सर्व संगणक आणि संबंधित साहित्य घेऊन केंद्र बंद करून मालक फरार झाला. शुक्रवारी सकाळी कर्मचारी नेहमीप्रमाणे ऑफिसला आले असता सर्व प्रकार उघड झाला. यानंतर कर्मचाऱ्यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

साकीनाका येथील एरोसिटी कॉर्पोरेट पार्कमध्ये अद्वय विद्या प्रवेश मार्गदर्शक प्रायव्हेट लिमिटेड नावाने हे केंद्र सुरु करण्यात आले होते. या केंद्रावर नीट युजी (NEET UG) परीक्षेसंदर्भात समुपदेशन केले जात होते. महिनाभरापूर्वीच ही कंपनी सुरू करण्यात आली होती. केंद्रात एकूण 52 कर्मचारी काम करत होते. कर्मचारी शुक्रवारी सकाळी नियमित वेळेत केंद्रावर आले असता केंद्र बंद झाल्याचे त्यांना समजले.

या केंद्रात विद्यार्थ्यांना नीट युजी (NEET UG) परीक्षा प्रवेशाची तयारी आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अर्ज कसा करायचा याबाबत समुपदेशन केले जात होते. नीट निकालानंतर समुपदेशन केंद्र फोनद्वारे चालवण्यात येणार होते, परंतु आता अचानक केंद्र गायब झाले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतनही मिळालेले नाही, अशी माहिती कंपनीच्या व्यवस्थापक बीना पॉल यांनी दिली.

26 जून रोजी, कार्यालयाचे नूतनीकरण करायचे आहे असे, सांगत कर्मचाऱ्यांना संध्याकाळी कामावरुन लवकर घरी सोडण्यात आले. दुसऱ्या दिवशी 27 जूनलाही कर्मचाऱ्यांना लवकर घरी सोडले. मात्र शुक्रवारी 28 जूनला सकाळी कर्मचारी कार्यालयात पोहोचले तेव्हा संगणकासह सर्व काही गायब असल्याचे दिसले. कर्मचाऱ्यांनी समुपदेशन केंद्राचे ऑपरेशन प्रभारी, आदित्य देशमुख यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते नॉटरिचेबल होते, असे बीना यांनी नमूद केले.