NEET परीक्षेत 0.001 टक्केही गैरप्रकार आढळल्यास….; सुप्रीम कोर्टाची NTA-केंद्राला नोटीस

नीट यूजी परीक्षा 2024च्या पेपरफुटी प्रकरणी मंगळवारी सुप्रीम कोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. मंगळवारी सुनावणीदरम्यान कोर्टाने परीक्षेतील गैरप्रकाराबाबत एनटीएला फटकारत केंद्र सरकार आणि एनटीएला नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. “अशा प्रक्रियेत 0.001 टक्केही गैरप्रकार आढळल्यास कठोर कारवाई केली पाहिजे. मुलांनी परीक्षेची तयारी केली आणि त्यांनी घेतलेली प्रचंड मेहनत विसरता कामा नये’, असे कोर्टाने बजावले आहे.

न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि न्यायमूर्ती एसलीएन भट्टी यांच्या खंडपीठाने याप्रकरणावर सुनावणी केली. आम्ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीकडे कानाडोळा करू शकत नाही. या परीक्षेसाठी मुलं दिवसरात्र मेहनत घेतात आणि आम्ही त्यांची मेहनत वाया जाऊ देणार नाही. सिस्टममध्ये एखादा हेराफेरी करणारा डॉक्टर बनला तर तो लोकांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो. कल्पना करा की सिस्टमशी खेळणारा व्यक्ती डॉक्टर बनला तर तो समाजासाठी किती धोकादायक असेल, असे म्हणत कोर्टाने एनटीएला फटकारले. या प्रकरणी आता 8 जुलैला सुनावणी होणार आहे. आता एनटीए आणि केंद्र सरकारला या संपूर्ण प्रकरणावर उत्तर द्यावे लागणार आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 1,563 विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेतली जात आहे. दोन ठिकाणांहून फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आल्याचे यापूर्वी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले होते. ग्रेस गुण मिळालेल्या 1,563 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या विद्यार्थ्यांना पेपर उशिरा मिळाल्याने आणि वेळ वाया गेल्याने या विद्यार्थ्यांना 718 ते 719 असे ग्रेस गुण दिले होते आणि आता त्यांचे स्कोअरकार्ड रद्द करण्यात आले आहे.

नीट परीक्षेत गैरप्रकार झाल्याबाबत 20 जणांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच याप्रकरणाची सीबीआय किंवा स्वतंत्र एजन्समार्फत चौकशी करण्याची मागणीही याचिकाकर्त्यांनी केली आहे. 67 मुले 720 गुण मिळवून पहिली आली. परीक्षेत काहींना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. तसेच एका विशिष्ट परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांना 720 पैकी 720 गुण मिळाले, याबद्दलही याचिकेत अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.