पेपरफुटीविरोधात उद्रेक; आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीहल्ला… एनटीए ऑफिसला टाळे ठोकले

नीट पेपर लीक आणि घोटाळय़ाप्रकरणी विद्यार्थी दिवसेंदिवस अधिकच आक्रमक झाल्याचे चित्र आहे. आज एनएसयूआय आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील ओखला येथील एनटीएच्या कार्यालयात घुसून पेंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच कार्यालयाला टाळे ठोकून निषेध व्यक्त केला. एनटीए परीक्षेला महिना उलटूनही पेपरफुटीप्रकरणी ठोस कारवाई न करणाऱया पेंद्र सरकारविरोधात संसद मार्गावर आंदोलन करण्यासाठी निघालेल्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले.

देशाची लूट होणार नाही असे मोदींनी सांगितले होते आणि संपूर्ण देशात लुटमार सुरू आहे, असे निदर्शने करणारे युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास यांनी सांगितले. देशात एकीकडे पेपर लीक होत आहेत तर दुसरीकडे मोदी सरकार एनटीएला वाचवण्यासाठी धडपडत आहे. मोदी सरकार आणि एनटीएच्या या नाकर्तेपणाचा फटका लाखो विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यांचे उज्ज्वल भविष्य उद्ध्वस्त झाले असून विद्यार्थ्यांना कुठल्याही स्थितीत न्याय मिळवून देणार, सरकारच्या हुकूमशाहीविरोधात अजिबात झुकणार नाही, अशी भूमिका काँग्रेसने एक्सवरून मांडली आहे.

नीटमध्ये अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न; दिल्ली हायकोर्टाची एनटीएला नोटीस
नीट परीक्षेत अभ्यासक्रमाबाहेरचे प्रश्न आल्याचा आरोप करणारी याचिका नीटच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने एनटीएला दिले असून नोटीस बजावली आहे. रेडीओ ऑक्टिव्हिटी प्रकरणी परीक्षेत प्रश्न विचारण्यात आले होते.

संसदेत आवाज उठवणार 

नीटच्या मुद्दय़ावरून देशभरात वातावरण प्रचंड तापले आहे. याप्रकरणी इंडिया आघाडी संसदेत आवाज उठवणार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना उत्तरे द्यावी लागणार आहेत. नीटचे प्रकरण हलक्यात घेऊ नका, हे प्रकरण दडपू देणार नाही, असा इशारा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिला आहे. एनडीए सरकार जबाबदारीपासून पळू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

– पोलिसांनी कितीही लाठीमार केला तरी विद्यार्थ्यांचे मनोबल सरकार तोडू शकत नाही. काहीही झाले तरी अन्यायाविरोधात लढणारच असे काँग्रेसने म्हटले आहे. युवक काँग्रेसच्या विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्सवर चढून संसदेच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला.