कश्मीरमध्ये तत्काळ निवडणूक घ्या; पक्षांची निवडणूक आयोगाकडे मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतिम मुदत जवळ येत असतानाच जम्मू आणि कश्मीरमध्ये तत्काळ निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी येथील राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे केली.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली आणि निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि एसएस संधू यांच्यासह आयोगाच्या समितीने आज प्रस्तावित निवडणुकीसंदर्भात राजकीय पक्ष तसेच प्रशासन आणि पोलीस यंत्रणांच्या प्रमुखांशी दिवसभर विविध बैठकांमध्ये चर्चा केली. येथील इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोव्रॅटिक पार्टी, भाजप या राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची भेट झाली. जम्मू आणि कश्मीरमध्ये तत्काळ विधानसभा निवडणूक घ्यावी, अशी मागणी या वेळी सर्व राजकीय नेत्यांनी केली.

आयोगाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या पक्षनिहाय बैठकीनंतर सर्वपक्षीय नेत्यांनी सांगितले की, राज्यात तातडीने विधानसभा निवडणूक घेण्याच्या मागणीवर त्यांचे एकमत आहे.

 30 सप्टेंबरपर्यंत मुदत

  सुप्रीम कोर्टाने केंद्राला 30 सप्टेंबरपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप निवडणूक आयोगाने जाहीर केले नसले तरी मुदत संपायला फक्त सात आठवडे उरले आहेत.