मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणा केवळ कागदावरच, रोहित पवारांची महायुतीवर टीका

महायुती सरकारने मराठवाड्यासाठी ५९ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती, पण प्रत्यक्षात एक हजार कोटी रुपये सुद्धा दिले नाही असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी केला आहे. तसेच मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणा फक्त कागदावरच राहिल्या आहेत असेही पवार म्हणाले.

एक्सवर पोस्ट करून रोहित पवार म्हणाले की, फसवणूक करून सत्तेत आलेल्या सरकारने मराठवाड्याची सुद्धा फसवणूकच केली. गेल्या वर्षी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेऊन ५९००० कोटींच्या पॅकेजची घोषणा केली, पण प्रत्यक्षात मात्र मराठवाड्याला १००० कोटी सुद्धा दिले नाहीत. मराठवाड्यासाठी केलेल्या घोषणा केवळ कागदावरच ठेवल्या. सर्वाधिक घोषणा जलसंपदा विभागाने केल्या होत्या, पण या विभागाच्या निष्क्रिय मंत्र्यांनी काडीमात्र सुद्धा काम केले नाही असे रोहित पवार म्हणाल.

तसेच आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पुन्हा घोषणा करतील, नेहमीच्या सवयीप्रमाणे बोलून मोकळे होतील आणि निघून जातील. असो, मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारकाची घोषणा केली तर कंत्राट देताना दलालीची अपेक्षा न ठेवता, आपटे सारख्या व्यक्तीला न देता एखाद्या चांगल्या व्यक्तीला द्या हीच सरकारला विनंती राहील असेही पवार म्हणाले.