रायगडावर घुमला ‘तुतारी’चा नाद! शरद पवारांनी डोलीतून केला किल्ला सर, पक्षचिन्हाचं केलं अनावरण

अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आणि हे प्रकरण निवडणूक आयोगापुढे गेले. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला, तर शरद पवार गटाला ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार’ हे नवे नाव आणि ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिले. या नव्या चिन्हाचे आज किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने अनावरण करण्यात आले.

पक्षचिन्हाच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार डोलीत बसून किल्ले रायगडावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन पक्षचिन्हाचे अनावरण करण्यासाठी शरद पवार हे तब्बल 40 वर्षांनी किल्ले रायगडावर पोहोचले. शरद पवारांनी आधी पायथ्यापासून वरपर्यंत रोप-वे मार्गे आणि तिथून पुढे डोलीतून प्रवास केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम घेत आणि तुतारी वाजवून चिन्हाचे अनावरण करण्यात आले.

पक्षचिन्हाच्या अनावरण कार्यक्रमावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिहासिक भूमीत आपण आलोय. याठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करूया.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

दरम्यान, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार’ पक्षाला नवीन चिन्हाबाबत शुभेच्छा दिल्या. “विरोधात असणाऱ्या पक्षांना फोडायचं आणि अधर्माने संपवायचं हीच नीती असणाऱ्या नीच सत्ताधाऱ्यांविरुद्ध, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब पुन्हा एकदा दंड थोपटून उभे राहिले आहेत. ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ ह्या पक्षाचे नवीन चिन्ह ‘तुतारी’ घेऊन आजपासून जनतेत जात आहेत. त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा!”, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.