महायुतीत धुसफूस? सुनेत्रा पवार यांच्या अर्ज भरण्याकडे शिंदे-फडणवीसांची पाठ; शरद पवार यांच्या पक्षाची टीका

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी दणदणीत पराभव केलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या आता राज्यसभेवर जाणार आहेत. राज्यसभेवर त्यांची बिनविरोध निवड झाली आहे.


अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी अर्ज दाखल करताना अजित पवार गटाचे सर्व मोठे नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नीचा अर्ज दाखल करते वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात महायुतीतील हे बडे नेते उपस्थित नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने याबाबत ट्विट करत महायुतीवर टीका केली आहे. ”लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीमध्ये वितुष्ट आलं आहे. सुनेत्रा पवार यांचा राज्यसभेचा अर्ज भरण्याच्या उपस्थितीकडे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी पाठ फिरवत महायुतीमध्ये सावळा गोंधळ असल्याचा दाखवून दिलं आहे”, असे शरद पवार यांच्या पक्षाने ट्विट केले आहे.

सुनेत्रा पवार यांनी बारामती मतदारसंघातून लोकसभेचा अर्ज भऱला तेव्हा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले उपस्थित होते. मात्र लोकसभा निवडणूकीनंतर महायुतीतलं चित्र बरचंस बदललं आहे. महायुतीला लोकसभा निवडणूकीत जोरदार फटका बसला. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फोडाफोडी व गद्दारीमुळे महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला नाकारल्याचे चित्र आहे.