अजित पवार यांचे तिथेही टपल्या मारायचे काम चालूच आहे, जितेंद्र आव्हाड यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. ”आघाडीत असतानाही दादा काँग्रेसला डिस्टर्ब करायचे, काँग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची, काँग्रेसच्या मंत्र्यांची फाईल मागवून नंतर ती दाबून ठेवायची, त्यामुळे त्यांचा स्वभाव तिथे गेल्यावर बदलेल यात प्रश्नच येत नाही ते तिथेही टपल्या मारायचे काम चालूच ठेवणार’, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्ट मध्ये आव्हाड यांनी विविध मुद्द्यांवर त्यांचे मत मांडले आहे. ”अजितदादांचा स्वभाव असा आहे की, ते शेजारच्याला शांत बसू देत नाही. गेले अनेक वर्ष मी त्यांचा स्वभाव अनुभवलेला आहे, खास करून आघाडी झाल्यापासून जास्तच अनुभवला आहे. कायम ते काँग्रेसला डिस्टर्ब करायचे, काँग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची, काँग्रेसच्या मंत्र्यांची फाईल मागवायची ती दाबून ठेवायची, त्यामुळे त्यांचा स्वभाव तिथे गेल्यावर बदलेल यात प्रश्नच येत नाही ते तिथेही टपल्या मारायचे काम चालूच ठेवणार, अशी टीका आव्हाड यांनी केली.

”अजितदादा ठाण्यात येतात आणि असं वक्तव्य करतात की, ठाण्यात गुंडगिरी वाढलेली आहे. मग हा बाण नक्की कोणावर आहे ? तर, माझ्या दृष्टीने तो एकनाथ शिंदेंवर आहे, म्हणजे मुख्यमंत्र्यांनाच ते संशयाच्या फेऱ्यात अडकवतात असे म्हणायला हरकत नाही. मी उपमुख्यमंत्री आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या देखील वरती आहे असा त्यांचा समज असतो, मग ते सर्व विभागाची मीटिंग बोलवतात; त्यांच्याकडे नसलेल्या विभागाची ही मीटिंग बोलवतात, मग त्यांच्या सेक्रेटरीला बोलवतात आणि मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांचे आदेश ते स्वतः देऊन टाकतात, ही त्यांच्या कामाची पद्धत आहे आणि या पद्धतीत ते कधीच बदल करणार नाही. तिथे एकनाथ शिंदे असो किंवा देवेंद्र फडवणीस असो. अजित पवार हे को-रिलेशनमध्ये मिनिस्टर बनूच शकत नाही, ते शांत राहूच शकत नाही. भाजप आणि एकनाथ शिंदे यांनाही ते डिस्टर्ब करणार आणि वर सांगणार मी माझा पक्ष वाढवत आहे, त्यात काय चूक आहे. त्यांचे डिस्टर्ब करण्याचे जे चाळे आहेत ते कधीही थांबत नाही आणि त्याचा अनुभव आम्ही घेतलेला आहे. आमच्या डिपार्टमेंटच्या मीटिंगही त्यांनाच लावायच्या असतात”, असा टोला आव्हाड यांनी लगावला.

”गुजरात सरकारच्या जातीयवादी परंपरेला मोठा धक्का आहे. ज्या भगिनीवर 14-14 लोकांनी बलात्कार केला, तिच्या घरातल्या 12 जणांना मारून टाकले असा अमानुष हत्याकांड हे भारताच्या इतिहासात कधीही घडलेलं नव्हते. सुदैवाने ती जिवंतपणाने उभी राहून तिच्यासमोर घडलेल्या प्रसंगाची आठवण ठेवून तिने खटला लढवला, अनेकांना हा विसर पडला असेल की, हा खटला महाराष्ट्रात चालवावा अशी तिने विनंती केली, कारण तिचा महाराष्ट्रावर जास्त विश्वास होता आणि महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर जास्त विश्वास होता, त्यासोबतच महाराष्ट्राच्या पोलिसांवर तिचा जास्त विश्वास होता. निकाल लागला त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली, अचानक गुजरात सरकारने भूमिका घेतली की, त्यांना माफी द्यावी खरंतर सरकारचे हे कामच नाही, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याचे मी स्वागत करतो”, अशी

”राहुल नार्वेकर हे विधानसभेत येतील की, नाही याची मला खात्री नाही, कारण त्यांना कोविड झाल्याची माहिती आहे, त्यामुळे हा राजकीय कोविड आहे की, नक्की कोविड आहे हे समजायला काही मार्ग नाही”. असा टोला आव्हाड यांनी लगावला.