नागपाडय़ात 31 किलो मेफ्रेड्रॉन जप्त,एनसीबीची कारवाई

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने नागपाडय़ात कारवाई करून 31. 50 किलो मेफ्रेड्रॉन जप्त केले. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 60 कोटी असून आणखी रोख 69 लाख रुपये जप्त केले आहेत. याप्रकरणी तिघांना एनसीबीने अटक केली आहे.

दक्षिण मुंबईतील नागपाडा परिसरात अमली पदार्थ तस्करीची माहिती एनसीबी मुंबई युनिटला मिळाली. त्या माहितीनंतर नागपाडा परिसरात एनसीबीने सापळा रचला. मुशर्रफ जे. के. नावाचा एक जण नागपाडा आणि डोंगरी येथून ड्रग्जचे नेटवर्क चालवत असल्याची माहिती मिळाली. त्याला ओळखणे कठीण होते. एनसीबीने तेथे 24 तास सापळा रचून काही माहिती गोळा केली. बुधवारी एनसीबीने नागपाडा आणि डोंगरी येथे टीम तैनात केली. काही वेळात मुशर्रफ हा आला. त्याला एनसीबीच्या अधिकाऱयाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून 10 किलो मेफ्रेड्रॉन जप्त केले. कसून चौकशी केल्यावर त्याने एका ठिकाणी ड्रग्ज ठेवल्याचे एनसीबीला सांगितले. त्यानंतर एनसीबीचे पथक डोंगरी येथे गेले. तेथे नौशीन नावाच्या महिलेच्या घरातून आणखी 10 किलो मेफ्रेड्रॉन आणि 69 लाख रुपये रोख जप्त केले. नौशीनच्या चौकशीत सैफची माहिती मिळाली.

सैफ हा ड्रग्जची डिलिव्हरी करणार असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. एनसीबीने आज वडाळा येथे सापळा रचून सैफला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 11 किलो मेफ्रेड्रॉन जप्त केले. एनसीबीने कारवाई करून 31.50 किलो मेफ्रेड्रॉन जप्त केले. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे 60 कोटी रुपये अंदाजे इतकी आहे. हे सिंडिकेट गेल्या काही वर्षांपासून सक्रिय असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे. एनसीबीने याप्रकरणी आणखी तिघांना ताब्यात घेतले. त्या तिघांची चौकशी सुरू आहे.