सहा लाख रुपये बक्षीस असलेल्या नक्षलवादी गणेश गट्टा पुनेम याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. कट्टर माओवादी असलेला गणेश हा नक्षल चळवळीमध्ये 2017 मध्ये सहभागी झाला होता आणि सध्या सक्रिय होता. गणेश पुनेम हा 2018 पासून सप्लाय टीम उपकमांडर छत्तीसगड राज्यातील भैरमगढ एरिया पदावर कार्यरत होता. त्याच्यावर सहा लाख रुपयांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं.
गणेशवर 2017 साली छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यातल्या मौजा मिरतुर येथील चकमकीत सहभागी असल्याचा आरोप आहे. त्या खेरीज 2022मध्ये बिजापूरमधील तिम्मेनार या गावातल्या वनक्षेत्रात झालेल्या चकमकीतही तो सहभागी होता. नक्षलवादी जीवन हे अतिशय खडतर असून अशा परिस्थितीत प्रकृती अस्वास्थ्याकडेही गटाकडून दुर्लक्ष केलं जातं. तसंच, गटाचे वरिष्ठ नेते हे आंदोलनाच्या नावाखाली पैसे गोळा करायला सांगून त्या रकमेचा वापर वैयक्तिक वापरासाठी करतात, असा आरोप करत गणेश याने आत्मसमर्पण केलं आहे.
गटातले वरिष्ठ माओवादी नेते गरीब आदिवासी तरुणांचा वापर करतात. एखाद्या नक्षलवाद्याचा विवाह झाला तरीही त्याला वैवाहिक जीवन जगण्याचा अधिकार दिला जात नाही. हे नेते पोलिसांना खबर देण्याच्या संशयावरून देखील आपल्याच भाऊबंधाची हत्या करायला सांगतात. या सगळ्याला कंटाळून आपण आत्मसमर्पण करत आहोत, असंही गणेश याचं म्हणणं आहे.