श्री क्षेत्र माहूर येथील रेणुका माता गडावर नवरात्रोत्सवास प्रारंभ

महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी एक पुर्ण व मुळपीठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता गडावर गुरुवार दिनाक 3 ऑक्टोबर रोजी परंपंरेनुसार नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. अश्वीन शुद्ध प्रतिपदेला ‘ऊदे ग अंबे उदे’ च्या गजरात पहिल्या माळीला (दिवसाला) सकाळी 7 वाजता पासून टि.व्हि. स्टार सनई वादक नितीन धुमाळ व संच (नाशिक) यांच्या सनईच्या सुरात व पौराहीत्य वेदशास्त्री निलेश केदार गुरुजी, अनिल काण्णव यांचा संच व वेद शाळेचे शिष्यांनी प्रसिद्ध घोषात अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महापूजेने सुरुवात झाली.

गणेश पुजन, कलश (वरुन) पुजन, पुण्याहवाचन, मातृकापुजन, पारायण शतशुक्ती पारायन करण्यात आले. पुजारी भवानीदास भोपी, शुभम भोपी, विनायक फांदाडे, विश्वस्त बालाजी जगत यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक करण्यात येवून सिंगार, अलंकार करून पिवळा रंगाचे पैठनी महावस्त्र परीधान करण्यात आले. श्री रेणुका मातेच्या मुख्य गाभार्‍यातील व परिसरातील परिवार देवता श्री तुळजाभवानी मंदीर, श्री परशुराम मंदीर, श्री महालक्ष्मी मंदिरात एका पाषाणाच्या कुंडामध्ये मातृका भरुन त्यात संप्त धान्य टाकुन, कुंडावर मातीची कलश, त्यात नागवेलीची पाने व श्रीफळ, साभोताल पाच उसाचे धांडे उभारुन आणि त्या आधारे कलशावर (पुष्पहार) पहिली माळ चढवून सकाळी 10 वाजता संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा प्रथम जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमवार, सहा.जिल्हाधिकारी तथा सचिव मेघना कावली, विश्वस्थ चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, दुर्गादास भोपी यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. पायस नैवेद्य गायीचे तुप व दुपारी 11.30 वाजता श्री मातेस महानैवेद्य ठेवून महाआरती करण्यात आली. अध्यक्ष सुरेखा कोसमवार, सचिव मेघना कावली यांच्या हस्ते कुमारीका पुजन, आरती करण्यात आली. नंतर छबिना मिरवणूक काढण्यात येऊन परिसरातील परिवार देवतांची पूजा नैवेद्य व आरती पूजन करण्यात आले.

अखंड नंदादिप पूजन, सुवर्ण अलंकार पूजन करण्यात आले. श्री दुर्गासप्तशती शतचंडी पाठाची सुरुवात, संकल्प, चतुर्वेद वेद पारायण सुरुवात करण्यात आली. पायस नैवेद्य, गायीचे तुप, छबीना परिवार देवता पूजन झाल्यानंतर भाविकांसाठी परशुराम मंदिर परिसरात महाप्रसाद सुरु करण्यात आला. प्रतिपदेपासून दशमीपर्यंत मंदीरात अखंड देवी समोर नंदादिप तेवत ठेवून दररोज पायास म्हणजे दही भात, पुरणपोळीचा नवैद्य, आरतीनंतर छबिना कढला जावून, रेणुका ज्या गडावर प्रकटली त्या गडाला प्रदक्षीना घालुन छबिना परत रेणुका मंदिरात येत असतो.

यावर्षी मुंबई येथील उद्योगपती नरेंद्र हेटे यांनी नवरात्र निमित्त सोन्याने गाठवलेले 5 फुट मंगळसुत्र व डायमंड बिंदी अर्पण केली आहे. यामुळे भाविकांना यावर्षी रेणुका मातेचे नविन रूप पाहावयास मिळत आहे. गडावर जाणार्‍या रस्त्यावरील टी पॉइंट व मेन रोडवर पोलीसांनी बॅरीकेट लावून खाजगी वाहनांना गडावर जाण्यास बंदी केली आहे. एसटी महामडळाकडून 100 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. नगरपंचायतकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. आज पहिल्याच माळीला महाराष्ट्र, तेलंगणा राज्यातील भाविकांनी सकाळ पासूनच गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरीता अप्पर पोलीस अधिक्षक खंडेराव धरने, उपविभागिय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघने, सहायक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे हे आपल्या कर्मचार्‍यांसह चोख बंदोबस्त ठेवत आहेत.