गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नवज्योत बांदिवडेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार

नुकत्याच गोव्यात पार पडलेल्या 55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘घरत गणपती’ चित्रपटाचे दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकाचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

55व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जागतिक स्तरावर नावाजलेले देश-विदेशातील अनेक दर्जेदार चित्रपट दाखवण्यात आले. या महोत्सवात ‘घरत गणपती’ चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. या वेळी मराठी आणि अमराठी लोकांनी चित्रपट पाहिला आणि कौतुक केले. चित्रपट क्षेत्रातील दिग्गज मंडळींनीसुद्धा चित्रपटाबाबत चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना नवज्योत बांदिवडेकर म्हणाले, माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. माझा हा पहिला मराठी पुरस्कार असून आंतरराष्ट्रीय महोत्सवात मराठी चित्रपटाला पुरस्कार मिळाला याचा खूप अभिमान वाटतो. पुरस्कारानंतर आता जबाबदारी वाढली असून यापुढेही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा पुढे नेणार आहे. नवज्योत बांदिवडेकर यांचा दिग्दर्शक म्हणून ‘घरत गणपती’ हा पहिलावहिला चित्रपट जुलै महिन्यात प्रदर्शित झाला होता. यात त्यांनी गणपतीत एकत्र येणाऱया कुटुंबाची कथा मांडली होती.