नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बॅगेज टॅग, बोर्डिंग पासचे अनावरण

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी विमानाच्या लॅण्डिगची चाचणी यशस्वी झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे अध्यक्ष फैज अहमद किडवई आणि विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार यांच्या हस्ते आज विमानतळाच्या बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅगचे अनावरण केले. त्यामुळे या विमान तळावरून विमानाचे टेकऑफ होण्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या एप्रिल महिन्यात विमानतळाचे उद्घाटन होणार असून मे महिन्यापासून विमानतळ प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. विमानतळावरून विमाने टेक ऑफ आणि लॅण्डिगसाठी आता फक्त दोन महिन्यांचा कालावधी उरलेला असताना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे अध्यक्ष फैज अहमद किडवई, विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार आणि नागरी विमान वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रादेशिक संचालक प्रकाश निकम यांनी विमानतळाची पाहणी केली आणि विमानतळावर दिल्या जाणाऱ्या सर्वच सेवांचा आढावा घेतला. बोर्डिंग पास आणि बॅगेज टॅगचेही त्यांनी अनावरण केले. याप्रसंगी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल, महाव्यवस्थापक गीता पिल्लई आदी उपस्थित होते.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालय आणि विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस नवी मुंबई विमानतळाच्या सर्वच सेवांची कसून तपासणी केली. सिडको आणि एनएमआयएएलच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना काही सुधारणा करण्यासाठी सूचनाही केल्या.

विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी केली पाहणी

11 ऑक्टोबर 2024 रोजी नवी मुंबई विमानतळावर हवाई दलाच्या विमानाचे लॅण्डिग झाले होते. त्यानंतर 29 डिसेंबर 2024 रोजी इंडिगोच्या प्रवासी विमानाचे लॅण्डिग करून धावपट्टीची चाचणी घेण्यात आली. या दोन्ही महत्त्वाच्या चाचणी यशस्वी झाल्यानंतर अनेक विमान कंपन्यांच्या पथकाने नवी मुंबई विमानतळाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.