निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये कोणतेही काम करताना निवडणूक आयोगाची परवानगी घेणे आवश्यक असले तरी नवी मुंबई महापालिकेने मात्र 50 कोटींच्या कामांचे टेंडर परस्पर उघडले आहे. प्रभारी शहर अभियंता संजय देसाई यांनी सेवानिवृत्तीच्या अगोदर दोन दिवसांपूर्वी हा कारनामा केला असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते गलगली यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहे. तरीही हे टेंडर उघडण्यासाठी इतकी घाई का करण्यात आली, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गलगली यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. पैलास शिंदे आणि निवडणूक आयोगाकडे केली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाला हे टेंडर उघडण्यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची परवागनी घेणे आवश्यक होते. मात्र संजय देसाई यांनी अशी कोणतीही परवानगी न घेता हे टेंडर उघडून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग केला आहे. देसाई हे महापालिकेच्या सेवेतून आज 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले आहेत आणि हे टेंडर दोन दिवस अगोदर 29 मे रोजी उघडण्यात आले आहे.
एकाच कंपनीवर मेहरबानी
संजय देसाई यांनी 29 मे रोजी जे टेंडर उघडले आहे त्यातील बहुतेक कामे ही अश्विनी इन्फ्रास्ट्रक्चर या पंपनीला मिळालेली आहेत. या एकाच पंपनीवर नवी मुंबई महापालिकेच्या अभियांत्रिकी विभागाने इतकी मेहरबानी का दाखवली आहे, असा प्रश्नही गलगली यांनी उपस्थित केला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असताना शहर अभियंता विभागाने किती कामे केली आणि त्या कामांची किती बिले देण्यात आली. ही कामे ज्या ठेकेदारांना देण्यात आली आहेत त्यांचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
z नवी मुंबई महापालिकेत काम करणाऱया अनेक अभियंतांचे ठेकेदारांबरोबर फक्त साटेलोटेच नाही तर काही जणांनी ठेकेदारांबरोबर थेट पार्टनरशिप केलेली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन ठेकेदारावर नेहमी मेहरबान असल्याचे यापूर्वीही पहायला मिळाले आहे. अनेक ठिकाणी तर अगोदर काम आणि नंतर टेंडर मंजूर करण्यात आले आहे. देसाई यांचा कारनामा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघडकीस आणल्यानंतर आता पुन्हा इंजिनीयर आणि ठेकेदारांच्या पार्टनरशिपची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.