100व्या नाटय़संमेलनाचे पुण्यात उद्घाटन; नाटय़ वर्तुळात रंगली चर्चा

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या 100 वे ऐतिहासिक नाटय़ संमेलन उद्घाटन पुणे -पिंपरी चिंचवड येथे येत्या 5 ते 7 जानेवारी या काळात होणार असल्याचे समजते. तसेच सात – आठ ठिकाणी विभागीय संमेलने घेतली जाणार आहेत. लवकरच याबाबतची सविस्तर माहिती नाटय़ परिषदेकडून दिली जाणार आहे.

कोरोनामुळे आणि नंतर अनेक कारणांनी 100वे नाटय़ संमेलन होऊ शकले नाही. आता या ऐतिहासिक संमेलनाची नांदी पुण्यातून होणार असल्याची चर्चा आहे. 5 जानेवारी रोजी संमेलनाचे उदघाटन पुणे येथे होईल. यावेळी 99व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, 100 व्या नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांना सूत्रे प्रदान करणार आहेत. त्यानंतर 6 आणि 7 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड येथे संमेलन होईल अशी चर्चा आहे.

नाटयसंमेलन कुठे आणि कसं आणि कधी होणार यावर विचारविनिमय सुरू आहे. निरनिराळे पर्याय विचाराधीन आहेत. ते सर्व नियामक मंडळ सदस्य आणि सर्वसाधारण सभेतील सदस्यांसमोर मांडले गेले आहेत. त्यांनी अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार कार्यकारिणीला दिले आहेत. 5 डिसेंबर रोजी कार्यकारिणीत चर्चा होऊन अंतिम निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत त्याची अधिकृत घोषणा नाटयपरिषदेतर्फे केली जाईल.