भाजप संविधानावर आणि देशाच्या एकतेवर हल्ला चढवत आहे; राहुल गांधींनी भाजपवर डागली तोफ

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी टेक्सासमध्ये असलेल्या भारतीयांशी संवाद साधला. आपल्या देशातील विविधतेतील एकता हीच आपली ताकद आहे. तसेच संविधान हा आपल्या देशाचा पाया आहे आणि त्यावरच भाजप हल्ला चढवत आहे, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर कडाडून टीका केली. देशातील जनता आता भाजप आणि नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. जनतेत असलेली भीती नाहिशी झाली आहे, हे आपले मोठे यश असल्याचेही त्यांनी सांगितले.

आरएसएस आणि भाजपला भारत ही एक संकल्पना, विचार आहे, असे वाटते. तर भारत हा अनेक विचारांचा देश आहे. विविधतेतील एकता हीच आपली ताकद आहे, यावर आमचा असा आमचा विश्वास आहे. देशातील प्रत्येकाला मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्याची गरज आहे. आता देशातील जनता जात, भाषा, धर्म, परंपरा किंवा इतिहास यांचा विचार न करता भाजपविरोधात एकवटली आहे. भाजप आपल्या देशातील एकतेवर आणि संविधानावर हल्ला चढवत आहे, हे आता जनतेला समजले आहे. त्यामुळे देशातील प्रत्येकजण या लढ्यात सहभागी होत आहे.

संविधानात बदल करण्याचे भाजपचे स्वप्न होते. याबाबत आपण जनतेला सांगितले आणि जनतेला ते समजले आहे. भाजप संविधान आणि देशाच्या परंपरेवर, एकतेवर हल्ले करत आहे. त्याविरोधात निर्भयतेने लढा देण्याचे आवाहन करत आपण अभयमुद्रेची माहिती दिली होती. जनता आता निर्भय होत आहे. जनतेतील भाजपबाबतची भीती नाहीशी झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप किंवा नरेंद्र मोदी यांच्याबाबतची जनतेच्या मनातील भीती दूर झाली. हे आपले मोठे यश आहे, जनतेने भाजपला देशातील लोकशाहीची जाणीव करून दिली आहे. तसेच देशाचा पाया असणाऱ्या संविधानावरील हल्ला खपवून घेणार नाही, असेही जनतेने भाजपला समजावले आहे. हेच आपल्या देशाचे मोठे यश असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.