महाशिवरात्री दिवशी ओडिशाच्या लिंगराज मंदिरात अपघात, महादीप अर्पण करताना गरम तेल अंगावर पडल्याने 3 जण भाजले

महाशिवरात्रीच्या उत्सवाला गालबोट लावणारी घटना बुधवारी रात्री ओडिशातील भुवनेश्वर येथील श्री लिंगराज मंदिरात घडली. मंदिराच्या शिखरावर महादीप घेऊन जात असताना सेवकाचा पायर घसरल्याने गरम तेल अंगावर पडून तीन जण जखमी झाले. जखमींमध्ये मंदिरातील एका कर्मचाराचा आणि एका पोलिसाचा समावेश आहे.

लिंगराज मंदिर हे 11 व्या शतकातील प्राचीन मंदिर आहे. महाशिरात्रीनिमित्त बुधवारी रात्री 10.40 च्या सुमारास मंदिरातील एक सेवक हातात महादीप घेऊन शिखरावर चढत होता. यावेळी सेवकाचा पाय घसरल्याने महादीपमधील गरम तेल सेवकासह दोघांच्या अंगावर पडले. यात तिघेही भाजले.

जखमींना सरकारी कॅपिटल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या उपवासाचा समारोप मंदिरातील ‘महादीप’ रोषणाईने केला जातो. भगवान शिवाच्या शुभविधीचे साक्षीदार होण्यासाठी हजारो भाविक जमले होते.