एअर इंडियाचा कर्मचाऱ्यांना धक्का; 180 पेक्षा जास्त जणांना दिला नारळ

एअर इंडिया ही सरकारी कंपनी टाटा समुहाने विकत घेतल्यावर आता आर्थिक घडी रुळावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी कंपनीला कर्मचारी कपात करावी लागत आहे. कंपनीने नुकतेच 180 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. याची चर्चा होत आहे. एअर इंडियामध्ये 18,500 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत. तर ग्रुप एअरलाइन, एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये सुमारे 6,200 कर्मचारी आहेत. टाटा समूहाने विमान कंपनी विकत घेतली तेव्हा दोन्ही एअरलाइन्समध्ये कंत्राटी कामगारांसह अंदाजे 13,000 कर्मचारी होते.

या प्रकरणी एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही या प्रक्रियेदरम्यान सर्व कराराच्या जबाबदाऱ्यांचा आदर करत आहोत. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रानुसार, कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना एअरलाइनच्या प्रत्येक वर्षाच्या सेवेसाठी 15 दिवसांच्या पगाराच्या बरोबरीत भरपाई पॅकेज मिळेल. एअरलाइनने यापूर्वी दोनदा स्वैच्छिक सेवानिवृत्ती योजना ऑफर केल्या होत्या ज्याचा 2,500 हून अधिक कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला होता. तोट्यात चाललेली एअर इंडिया टाटा समूहाने जानेवारी 2022मध्ये सरकारकडून खरेदी केली होती. तेव्हापासून त्यांचे बिझनेस मॉडेल पुन्हा रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

एअर इंडियाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की कपात झालेले कर्मचारी व्हीआरएस योजना आणि री-स्किलिंगच्या संधींत पात्र झाले नाहीत. एअर इंडिया एक जागतिक विमान कंपनी म्हणून स्वत:ला प्रस्थापित करण्याच्या दिशेने काम करत आहे. जानेवारी 2022 मध्ये जेव्हा टाटा समूहाने कंपनी विकत घेतली तेव्हा सुमारे 13,000 कर्मचारी तेथे काम करत होते. आता सुमारे 18,000 कर्मचारी एअरलाइनमध्ये काम करत आहेत. एअरलाइन्सचे लक्ष आता तरुण कर्मचाऱ्यांवर आहे आणि त्यांना कामावर घेतले जात आहे. जुन्या कर्मचाऱ्यांना व्हीआरएस आणि रि-स्किलिंगची संधी देण्यात आली. या दोन्हीमध्ये पात्र न झालेल्या कर्मचाऱ्यांना आता कामावरून काढून टाकण्यात आले आहे.

एअर इंडियाने कॅन्टीन सेवा, स्वच्छता आणि एसी सेवेतील कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. यापूर्वी 12 मार्च रोजी एअरलाइनने 53 कर्मचाऱ्यांना बाहेर काढले होते. कंपनी विकत घेताना केंद्र सरकारने एअर इंडियाला सांगितले होते की, ते किमान 1 वर्ष कोणालाही कामावरून काढून टाकणार नाहीत. त्यानंतर व्हीआरएसची सुविधा देता येईल. त्यानुसार कंपनीनी व्हीआरएसची योजना आणली होती.