शेअर बाजारातील चढउताराचा परिणाम सराफा बाजारावरही होत असतो. यंदा दिवाळीत धनत्रयोदशी आणि पाडव्याला मोठ्या प्रमाणात सोने, चांदी, दागिने, अलंकार यांची खरेदी करण्यात आली. त्यामुळे सोन्याला झळाळी मिळाली आहे. दिवाळी संपल्यानंतर वेध लागतात ते देवदिवाळीचे आणि तुळशी विवाहाचे. त्यानंतर लग्नसराई सुरू होते. यंदाचा गल्नसराईचा हंगाम दणक्यात होणार आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात तब्बल 16 लग्नतिथी आहेत. त्यामुळे या मुहूर्तावर अनेक लग्नांचे बार उडणार आहेत. त्यामुळे सराफा बाजाराला पुन्हा तेजी येणार असून इतर व्यवसायांनाही उभारी मिळणार आहे.
प्रबोधिनी म्हणजेच देवउत्थापिनी एकादशी झाल्यानंतर 17 नोव्हेंबरपासून लग्नसराईला सुरुवात होत आहे. तर 15 डिसेंबरपर्यंत तब्बल 16 विवाहमुहूर्त आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात पंचागात 16 लग्नतिथी देण्यात आल्या आहेत. या मुहूर्तावर राज्यासह देशभरात तब्बल 48 लाख लग्नाचे बार उडणार आहेत. लग्नसराईच्या काळात सोन्याची, दागिन्यांची, अलंकारांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. त्यामुळे दिवाळीनंतर पुन्हा एकदा सोन्याला झळाळी मिळणार आहे. सोन्याचे दर येत्या काही महिन्यात एक लाखाचा टप्पा पार करण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. सराफा बाजाराप्रमाणे इतर व्यवसायांनाही यामुळे उभारी मिळणार आहे. लग्नसराईच्या या 16 मुहूर्तांच्या काळात तब्बल 6 लाख कोटींपेक्षा जास्त उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान 11 मुहूर्त होते. त्यावेळी 35 लाख लग्न लागले. यातून 4.25 लाख कोटींची उलाढाल झाली होती. त्यावरून हा अंदाज वर्तवण्यात येत आहे.