रामरायांच्या तपोभूमीतून शिवसेनेची डरकाळी, नाशिकमध्ये उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या पावन तपोभूमीतून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लोकसभेच्या लढाईचे रणशिंग फुंकण्यासाठी सज्ज झाली आहे. नाशिकमध्ये उद्या शिवसेनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन होत असून सायंकाळी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार असून राजकीयदृष्टय़ा अत्यंत महत्त्वाच्या अशा या घडामोडींकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.

महाअधिवेशन आणि जाहीर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सातपूर येथील हॉटेल डेमॉक्रॉसी येथे महाअधिवेशन होणार आहे. यात राज्यभरातून आलेले प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सकाळी 10 ते दुपारी दीड वाजेपर्यंत हे अधिवेशन होणार आहे. सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जन्मदिनानिमित्त अभिवादन करण्यात येईल. त्यानंतर शिवसेना पक्षाचा ध्वजारोहण सोहळा होणार आहे.

महाअधिवेशनात काय…

महाअधिवेशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, उपनेत्या सुषमा अंधारे यांचीही यावेळी भाषणे होतील. या अधिवेशनात शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई संघटनात्मक ठराव मांडणार आहेत. त्यासोबतच राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे निर्णयही घेतले जाणार आहेत. शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत प्रास्ताविक करणार आहेत.

सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. संपूर्ण मैदान भगवे झेंडे आणि भगव्या पताकांनी सजले आहे. मैदानाकडे जाणारे रस्ते आणि चौकही भगवेमय झाले आहेत. अधिवेशन होत आहे तो हॉटेल डेमोक्रॉसीचा परिसरही भगव्या झेंडय़ांनी उजळून निघाला आहे.

कारसेवा केलेल्या शिवसैनिकांचा होणार सत्कार
1992 मध्ये अयोध्येतील राम मंदिर आंदोलनात कारसेवा देणाऱया, जिवाची बाजी लावून लढणाऱया लढवय्या शिवसैनिकांचा जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हृद्य सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठी या शिवसैनिकांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

जगदंबेला साकडे घालणार
सभास्थळी मुख्य व्यासपीठाजवळ मंच उभारण्यात आला असून तिथे आदिशक्ती आई जगदंबेचा गोंधळ होणार आहे. यानिमित्ताने आई जगदंबेला पुन्हा एकदा ‘दार उघड बये दार उघड’ असे साकडेच घातले जाणार आहे. पुणे येथील शाहीर श्रीकांत रेणके आणि त्यांचे सहकारी हा गोंधळ साकारणार असून यावेळी रामवाणीही गुंजणार आहे.

सभा ठरणार ऐतिहासिक
हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. ही सभा अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. या सभेत निष्ठावंत शिवसैनिकांचे तुफान उसळणार असून सभेत उद्धव ठाकरे यांचा आसुड कडाडणार आहे. महाराष्ट्र-देशातील राजकीय स्थिती, विधानसभा अध्यक्षांचा निकाल, भाजपचा हुकूमशाही कारभार, खोक्याचे राजकारण यावर उद्धव ठाकरे कसा घणाघात करतात आणि लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी कोणता कानमंत्र देतात याकडे तमाम शिवसैनिकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे. सभेत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांचेही भाषण होणार असून शिवसेना नेते सुभाष देसाई प्रास्ताविक करतील.

शंखनाद करणारे शंखवल्लभ
नाशिकला झालेल्या कुंभमेळय़ात सलग 1947 वेळा शंखनाद करण्याऱया श्री वल्लभ व्यास तथा श्री शंखवल्लभ यांनी अयोध्येतल्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळय़ात त्यांनी 1 लाख 25 हजार वेळा शंखनाद करून आगळावेगळा पराक्रम केला आहे. शंखवल्लभ हे हैदराबाद येथील तेलंगणाचे रहिवासी असून ते अधूनमधून नाशिकला येत असतात. मंदिराच्या भूमिपूजन सोहळय़ापासून ते आजच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळय़ात त्यांच्या शंखनादाने भाविकांसह उपस्थित संतवृंदांचे लक्ष वेधून घेतले आहे.