महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल संशयास्पद असून, देश एकाधिकारशाहीकडे चालला आहे. लोकशाही जीवंत राहण्यासाठी ईव्हीएम हटवून मतपत्रिकांवरच मतदान घ्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी नाशिक जिल्हा महानुभाव परिषद व अखिल भारतीय वारकरी पंथ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला. यात सर्वपक्षीयांनी सहभाग घेतला. ईव्हीएमची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून ‘बॅक टू बॅलेट’, ‘लोकशाही वाचवा, संविधान वाचवा’, अशा घोषणा देत जनतेने ईव्हीएमविरोधातील असंतोष व्यक्त केला.
सामान्य जनतेचा ईव्हीएमवर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीचा निकाल संशयास्पद आहे, त्यामुळे निकालानंतर कुठेही आनंदाचे, समाधानाचे वातावरण दिसलेले नाही. मतदारराजाला न्याय मिळाला पाहिजे, या भावनेतून नाशिक जिल्हा महानुभाव परिषद व अखिल भारतीय वारकरी पंथ यांनी ‘ईव्हीएम हटाव’साठी शुक्रवारी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून शांततेत मोर्चा काढला. ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’, ‘लोकशाही वाचवा’, ‘बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे’ अशा घोषणा देत हा मोर्चा त्र्यंबकरोडने गंजमाळ सिग्नल, शालिमार, टिळकपथ, मेनरोड, मेहेर सिग्नलमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना निवेदन दिले. यावेळी महानुभाव पंथाचे महंत कृष्णराज बाबा मराठे, अखिल भारतीय वारकरी विकास मंडळाचे राज्य कमिटी सदस्य ह.भ.प. जनार्दन बळीराम महाराज कांदे (काकडे) यांनी जनतेच्या भावना मांडून मतपत्रिकेवरच मतदानाची मागणी केली. महाविकास आघाडीचे निफाडचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पराभूत उमेदवार अनिल कदम, कळवणचे माकपाचे पराभूत उमेदवार जे. पी. गावीत, नाशिक पश्चिमचे मनसेचे पराभूत उमेदवार दिनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे गजानन शेलार यांनी ईव्हीएमविषयीच्या तक्रारी मांडून त्याला विरोध दर्शवला.
लाखभर मते घेणाऱयांचे कर्तृत्व काय? – डॉ. कराड
ईव्हीएममुळेच लाख-लाख मतांच्या आघाडीने महायुतीचे उमेदवार निवडून आले. एवढी मोठी आघाडी मिळावी, असे त्यांचे कर्तृत्व काय, असा सवाल माकपाचे ज्येष्ठ नेते डॉ. डी. एल. कराड यांनी केला.
देश भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू – गावीत
गुजरातप्रमाणे एकाधिकारशाही संपूर्ण देशात आणली जात आहे, देश भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचे काम सुरू आहे, असा आरोप माकपाचे माजी आमदार जे. पी. गावीत यांनी केला. ईव्हीएमबाबत सर्वांच्याच मनात शंका असल्याचे ते म्हणाले.
मतांचा हिशोब मागणे हा नागरिकांचा हक्कच – कदम
खेडेगावांपासून मोठय़ा शहरांमधील नागरिकांना आपली मतं कुठं गेलीत, याचे आकलन अजूनही झालेले नाही. त्यांना मत देण्याचा आणि त्या मतांचा हिशोब मागण्याचाही अधिकार आहे, असे शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम म्हणाले.
देश एकाधिकारशाहीकडे चाललाय – पाटील
भाजपाने देशाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे सुरू केली आहे, असा आरोप मनसेचे दिनकर पाटील यांनी केला. जनतेच्या मनात ईव्हीएमविषयी शंका आहे, आमचे मतदान कुठे गेले, असा प्रश्न ते विचारत आहेत, असे ते म्हणाले.