चित्र, काव्य, साहित्य, संगीत असे विविध प्रकारचे कट्टे सर्वत्र असतात. पण या सगळय़ात वलयांकित असतो तो ‘नाटय़ कट्टा’! नाशिकचा ‘सावाना’चा, पुण्याच्या ‘भरत नाटय़ मंदिर’चा, ठाण्याच्या ‘गडकरी रंगायतन’चा, मुंबईचे श्री शिवाजी मंदिर, साहित्य संघ, मास्टर दीनानाथ, प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृह अशा विविध ठिकाणी जमणारे नाटय़ कट्टे मी अनुभवले आहेत. मुळात रवींद्र ढवळे या मित्रामुळे मला नाटकाचा किडा चावला आणि नंतर सगळे आयुष्यच नाटय़मय झाले. आम्ही ‘नाटय़नम्रता’ या संस्थेची स्थापना केली. मी नाशिकचा, त्यामुळे नाटकासंबंधी अनेक कामे करण्यासाठी मुंबईला यावे लागायचे. रंगकर्मी प्रभाकर पाटणकर आमचा त्यावेळी मुंबईतला आधारस्तंभ होता. तो स्टेट बँकेच्या मध्यवर्ती शाखेत नोकरी करायचा. त्यावेळी अनेक बँक कलाकारांना बँकेत नोकरीची संधी देत असत. कार्यालयाची वेळ संपली की सगळे रंगकर्मी बँकेजवळ ठरावीक ठिकाणी भेटत.
एकदा मी नाटय़विषयक कामासाठी मुंबईला आलो असताना प्रभाकरला भेटायला गेलो. नेहमीच्या ठिकाणी तमाम नाटय़वेडे जमायला लागले. गप्पाटप्पा रंगू लागल्या. रात्री साहित्य संघात होणाऱया कार्यक्रमाला सगळय़ांना जायचे होते. आम्ही चालत संघापर्यंत जायचे ठरवले. आमच्या त्या 15-16 जणांच्या टोळीत अशोक सराफ, दिलीप कोल्हटकर, राघू बंगेरा, अमोल पालेकर, जयराम हर्डीकर, प्रभाकर पाटणकर, विसू कामेरकर, दिलीप कुलकर्णी, अच्युत वझे, अशोक साठे, राजन ताम्हाणे, विवेक लागू आदी होते. आता 50 वर्षे झाली त्या घटनेला! नाटय़कर्मींची ती आनंदयात्रा फ्लोरा फाऊंटन ते चौपाटी अशी धमाल करत साहित्य संघापर्यंत गेली आणि संघाच्या कट्टय़ावर विसर्जित झाली. आता या मंडळींतले बरेच या जगातच नाहीत. जे आहेत ते केव्हा तरी, कधी तरी, कुठे तरी भेटतात, प्रेमाने बोलतात. बस्स, अजून काय हवे? अशोक सराफसारखा एखादा रंगकर्मी भरघोस पुरस्कार देऊन आणखीनच धन्य करतो. असो! आता केवळ आठवत राहायचे ते ‘नाटय़ कट्टे’ आणि त्या ‘नाटय़ यात्रा’!
पुन्हा असाच एकदा मुंबईला आल्यावर मी प्रभाकरला भेटलो. तेव्हा प्रभाकर मला म्हणाला, ‘आज रात्री ठाण्याला एका शाळेच्या हॉलमध्ये ‘रंगायन’च्या चार एकांकिकांचे प्रयोग आहेत. वेळ असेल तर चल माझ्याबरोबर.’ ‘रंगायन’च्या चार एकांकिका एक गठ्ठा बघायला मिळणे म्हणजे पर्वणीच होती. एकांकिका होत्या महेश एलपुंचवार लिखित आणि विजया मेहता दिग्दर्शित ‘होळी’, ‘सुलतान’, ‘एका म्हाताऱयाचा खून’ आणि ‘यातना घर.’ यात कलाकार होते प्रभाकर पाटणकर, दिलीप कुलकर्णी, मंगेश कुलकर्णी, तारका ठेंगडी (राधिका राव), मीना सुखठणकर (नाईक), रेखा कामत आणि इतर बरेच. हळूहळू कलाकार व तंत्रज्ञ जमले. हौशी नाटय़संस्थेने चार एकांकिका सलग सादर करायच्या याचे थोडेफार दडपण सगळय़ांवरच होते. प्रयोग सुरू होण्याच्या जरा आधी धो धो पाऊस कोसळू लागला. त्याही परिस्थितीत प्रयोग सुरू करायचे ठरत होते. तितक्यात ठाणे परिसरातले लाईट गेले. आम्हाला व प्रेक्षकांना पावसात, अंधारात घरी परत जाणेही अवघड झाले. मग असे ठरले की, लाईट येण्याची वाट बघायची आणि ते आल्यावर पहिल्या गाडीची वेळ होईपर्यंत जितक्या एकांकिका करता येतील तितक्या करायच्या.
मग काय, कुणीतरी घरून पंदील आणला, कुणी चहा, तर कुणीतरी खाणे आणले आणि पंदिलाच्या प्रकाशाच्या साक्षीने प्रेक्षक व रंगकर्मी यांची गप्पांची मैफल रंगली. पाऊस कधीच थांबला होता. आम्ही गप्पा आवरत्या घेतल्या. इतक्यात लाईट आले. आम्ही सगळेच प्रचंड हसलो आणि मार्गस्थ झालो. त्या रात्रीचे फलित म्हणजे नाशिकला प्रायोगिक रंगभूमी साकारण्याच्या रवींद्र ढवळेच्या स्वप्नात मी पण सामील झालो. आम्ही मित्रांनी प्रभाकर पाटणकर यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर नाशिकला इन्टीमेट थिएटरची मुहूर्तमेढ रोवली आणि ती नंतर यशस्वीही केली.
शब्दांकन -राज चिंचणकर