एलियनच्या शोधासाठी अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने एक महत्त्वाची मोहीम सुरू केली आहे. गुरूचा चंद्र ‘युरोपा’वर असलेल्या बर्फाळ महासागराखाली जीवसृष्टीचे पुरावे असू शकतात, असे शास्त्रज्ञांना वाटते. त्यांचा शोध घेण्यासाठी नासाने सोमवारी यान सोडले. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटर येथून एलन मस्क यांच्या कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटवरून ‘युरोपा क्लिपर’ यान प्रक्षेपित केले. ही मोहीम सहा वर्षे चालणार असून यादरम्यान हे यान सुमारे 3 अब्ज किलोमीटरचे अंतर कापणार आहे. युरोपा क्लिपर 11 एप्रिल 2030 रोजी गुरूच्या कक्षेत प्रवेश करेल.
काय आहे युरोपा?
युरोपावर 10 ते 20 मैल बर्फाचा महासागर आहे. पृथ्वीवरील सर्व महासागरांचे मिळून जेवढे पाणी होईल, त्यापेक्षा अधिक पाणी युरोपावर आहे. युरोपा स्पेसक्राफ्टला जर असं काही सापडलं तर ते शास्त्रज्ञांसाठी मोठं यश ठरेल. युरोपावर जीवसृष्टीला योग्य वातावरण आहे की नाही, हे त्यातून कळेल.