सुरक्षा बैठकीत हजर राहणारा जवान अटकेत

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शनिवारी गोरेगावच्या नेस्को येथे कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमापूर्वी उच्चस्तरीय सुरक्षा बैठकीत हजर राहिलेल्या लष्कराच्या जवानाला वनराई पोलिसांनी अटक केली. रामेश्वर मिश्रा असे त्याचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी याची बीकेसी येथे सभा झाली होती. त्यात मिश्राने बनावट कार्ड वापरून व्हीव्हीआयपी परिसरात प्रवेश केला होता. त्या प्रकरणी मिश्राचे कोर्ट मार्शल देखील सुरू आहे. मिश्रा त्या सभेला का हजर होता याबाबत तपास वनराई पोलीस करत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शनिवारी मुंबईत विविध लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. गोरेगावच्या नेस्को येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याबाबत नुकतीच सुरक्षा आढावा बैठक बोलावली होती. त्या बैठकीत एनएसजी स्पेशल प्रोटेक्शन युनिट, बीडीडीएस, मुंबई पोलीस प्रोटेक्शन युनिट, पंतप्रधानांच्या सुरक्षे संबंधित विविध विभाग, एसपीजी महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली. त्या बैठकीत परिमंडळ 12 मधील पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सभे दरम्यान एक अज्ञात व्यक्ती बनावट अधिकारी बनून त्या बैठकीत उपस्थित झाल्याचा आरोप करण्यात आला. मुंबई पोलिसांच्या संरक्षण विभागातील अधिकाऱयाला त्याचा संशय आला. त्याने मिश्राला थांबण्यास सांगितले. मात्र तो रिक्षा पकडून पळून गेला. मुंबई पोलिसांनी मिश्राला ऐरोली येथून अटक केली.