मोदीजी तुम्हाला घाई झाली, आता जनता भुर्दंड भोगतेय; सुप्रिया श्रीनेत यांचा निशाणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या अटक सेतूच्या पुलाला तडे पडले आहेत. तसेच अयोध्येतील राम मंदिरात पहिल्याच पावसात गळती लागली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने अनेक कामांचे धडाक्यात उद्घाटन केले. मात्र, आता त्या कामांना सहा महिने उलटत नाहीत, तोच त्यातील त्रुटी उघड होत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवत नरेंद्र मोदी यांना उद्घाटनाची घाई झाली होती. आता त्यामुळे जनता त्रास सहन करत असून जनतेला भुर्दंड सोसावा लागत आहे. अशा शब्दांत काँग्रेसच्या राष्टीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

याबाबत श्रीनेत यांनी एक्सवर पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, निवडणुकीपूर्वी फीत कापण्याची घाई मोदी यांना झाली होती. आता देश त्याचे परिणाम भोगत आहे, एवढीही काय घाई होती, मोदीजी, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच या पोस्टसह अटल सेतू, जबलपुर एयरपोर्ट,दिल्ली T1 एयरपोर्ट आणि श्रीराम मंदिर, अयोध्या यांचे फोटो टाकत तेथील अडचणी आणि समस्या याकडे लक्ष वेधले आहे.

श्रीनेत यांनी या पोस्टसह प्रत्येक कामासाठी झालेला खर्च, उद्घाटनाची तारीख आणि त्या कामात असलेल्या त्रुटी आणि समस्या मांडल्या आहेत. मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर सहा महिन्यांचा कालवधीही झालेला नाही आण या कामातील त्रुटी उघड होत आहे. हे गंभीर असून श्रीनेत यांनी याकडे लक्ष वेधत मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.