सलग तिसऱ्यांदा घेतली पंतप्रधान पदाची शपथ; दोन बाबूंच्या टेकूवर मोदी बसले

नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. चंद्राबाबू नायडू यांचा तेलगू देसम पक्ष, नितीशकुमार यांचा जनता दल युनायटेड पक्ष आणि इतर छोटय़ा घटक पक्षांच्या टेकूवर मोदी पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसले. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जे. पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामन, पियूष गोयल, एस. जयशंकर, जेडीएसचे एच. डी. कुमारस्वामी, एचएएमचे जीतनराम मांझी, चिराग पासवान, टीडीपीचे राम मोहन नायडू यांच्यासह 30 नेत्यांची कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे. त्याशिवाय 6 स्वतंत्र कार्यभार असलेले राज्यमंत्री तर 36 राज्यमंत्री अशा एकूण 72 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. यात मिंधे गटाला कॅबिनेट मंत्रिपद नाकारत केवळ एका राज्यमंत्रिपदावर बोळवण करण्यात आली आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1952, 1957 आणि 1962 अशा तीन निवडणुकांमध्ये बहुमत गाठून सलग तीनदा पंतप्रधानपद भुषविले होते. त्यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरले आहेत. तिसऱ्या टर्ममध्ये भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे मोदींना घटकपक्षांच्या कुबडय़ांवरच सरकार चालवण्याची कसरत करावी लागणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे लवकरच नड्डा यांच्याकडील भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा अन्य नेत्याकडे सोपवली जाईल, हे स्पष्ट झाले आहे.

मान्यवरांची उपस्थिती

श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यासह हिंदुस्थानच्या शेजारील आणि हिंदी महासागर क्षेत्रातील नेते शपथविधी समारंभाला उपस्थित होते. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, अभिनेता शाहरुख खान, रजनीकांत, अक्षय कुमार, अनिल कपूर, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी सोहळ्याला हजेरी लावली.

मुहूर्त काढून मोदींनी शपथ घेतली. मुहूर्तानुसार 7 वाजून 15 मिनिटांनी शपथविधीला सुरुवात झाली.

तेलगु देसमचे खासदार पेम्मासानी सर्वात श्रीमंत मंत्री

टीडीपी खासदार डॉ. चंद्रशेखर पेमसानी हे 5700 कोटी रुपयांच्या संपत्तीसह नवीन मंत्रिमंडळातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. त्यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे सर्वाधिक 484 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सात माजी मुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ

नरेंद्र मोदींसह सात माजी मुख्यमंत्र्यांनी आज शपथ घेतली. शिवराज सिंह चौहान (मध्य प्रदेश), राजनाथ सिंह (उत्तर प्रदेश), मनोहर लाल खट्टर (हरियाणा), सर्बानंद सोनोवाल (आसाम), एचडी कुमारस्वामी (कर्नाटक) आणि जीतन राम मांझी (बिहार) हे सर्व माजी मुख्यमंत्री आहेत.

गांधीजी, अटलजींपुढे मोदी नतमस्तक

मोदींनी सकाळी सर्वप्रथम राजघाटावर दाखल झाले. तिथे महात्मा गांधींना आदरांजली वाहिल्यानंतर ते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीवर नतमस्तक झाले. राष्ट्रीय युद्ध स्मारकालाही त्यांनी अभिवादन केले.

संभाव्य मंत्र्यांची बैठक सकाळी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झाली. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा झाली. मोदींनी शंभर दिवसांचा रोडमॅप सांगून त्यानुसार काम करण्याचे निर्देश दिले. प्रलंबित योजना मार्गी लावण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

केवळ एक खासदार असलेल्या बिहारमधील हिंदुस्तानी अवाम मोर्चाच्या (धर्मनिरपेक्ष) जीतन राम मांझी यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे.

नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक सोमवारी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणार आहे.

राज्यमंत्रीपद नको म्हणून मिंधेपुत्राचा नकार!

प्रताप जाधव यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागल्यानंतर आम्ही कार्यकर्त्याला आधी मान देतो, असा आव मिंधे पितापुत्राने आणला. मात्र, प्रत्यक्षात यात वेगळीच गोम आहे. कॅबिनेट ऐवजी राज्यमंत्रीपद वाटय़ाला येणार असल्याने त्यास मिंधेपुत्राने नकार दिला व त्यानंतर प्रताप जाधव यांचे नाव दिले गेले अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

खरगे शपथविधीला उपस्थित

शपथविधी सोहळ्यासाठी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते. घटनात्मक कर्तव्य आणि राज्यसभेतील विरोधीपक्षनेता म्हणून मी सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे ते म्हणाले. त्याचवेळी अनेक विरोधी पक्षांच्या नेते सोहळ्याला अनुपस्थित होते.

स्मृती ईराणी, अनुराग ठाकूर यांना स्थान नाहीच

अमेठीतून काँग्रेसकडून पराभवाचा धक्का बसलेल्या स्मृती ईराणी यांना सरकार स्थापनेतही धक्का बसला आहे. ईराणी यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. अनुराग ठाकूर यांनाही मंत्रिपद नाकारण्यात आले आहे.

नवे मंत्रिमंडळ

कॅबिनेट मंत्रीः राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारामन, एस. जयशंकर, मनोहर लाल खट्टर, एचडी कुमारस्वामी, पीयुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतनराम मांझी, राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह, सर्बानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, किंजरापू राम मोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुआल ओरम, गिरीराज सिंह, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे, भूपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन रिजिजू, हरदीप सिंग पुरी, मनसुख मांडविया, जी. किशन रेड्डी, चिराग पासवान, सीआर पाटील.

राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) – राव इंद्रजित सिंग, जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवाल, प्रताप जाधव, जयंत चौधरी

राज्यमंत्रीः जितीन प्रसाद, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, व्ही सोमन्ना, डॉ. चंद्रशेखर पेम्मासानी, एसपी सिंग बघेल, शोभा करंदलाजे, कीर्तीवर्धन सिंग, बीएल वर्मा, शंतनू ठाकूर, सुरेश गोपी, एल मुरुगन, अजय तमटा, बंदी संजय कुमार, कमलेश पासवान, भगीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे, संजय सेठ, रवनीत सिंग बिट्टू, दुर्गा दास उईके, रक्षा खडसे, सुकांता मजुमदार, सावित्री ठाकूर, तोखान साहू, राजभूषण चौधरी, भूपतीराजू श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन जयंतीभाई बांभनिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन, पवित्र मार्गेरिता.

विरोधी पक्ष भक्कम झाल्याने रजनीकांत खूश

नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान मिळाला यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो, अभिनेते रजनीकांत म्हणाले. त्याचवेळी इंडिया आघाडीच्या यशाचे त्यांनी ‘जोरदार’ असे वर्णन केले.जनतेने  भक्कम असा विरोधीपक्षही निवडून दिला आहे. हे लोकशाहीसाठी चांगले लक्षण आहे, असे ते म्हणाले.

मिंधेंच्या पदरी केवळ एक राज्यमंत्रिपद

संख्याबळानुसार एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळेल म्हणून मिंधे गट गुडघ्याला बाशिंग बांधून बसला होता. मात्र, मिंधे गटाला कॅबिनेट मंत्रिपदासाठी ठेंगा दाखवण्यात आला असून मोदींनी केवळ स्वतंत्र प्रभार असलेलं एक राज्यमंत्रिपद त्यांच्या पदरात टाकलं आहे.

द्यायचे तर कॅबिनेट मंत्रिपद द्या…अजित पवारांचं भाजपशी वाजलं

अजित पवार गटाला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. त्यावरून भाजप आणि अजित पवारांचे चांगलेच वाजले आहे. अजित पवार गटाला एक राज्यमंत्रिपद देऊ केले होते. मात्र, कॅबिनेटसाठी हट्ट धरत ही ऑफर धुडकावण्यात आली आहे. आमच्याकडून प्रफुल्ल पटेल यांचे नाव निश्चित केले गेले होते. पटेल यांनी याआधी कॅबिनेट मंत्री म्हणून काम केलेले असल्याने त्यांना आता राज्यमंत्रिपद देणे चुकीचे वाटते. द्यायचे असेल तर आम्हाला कॅबिनेट मंत्रिपद द्या,  असे आम्ही भाजप नेतृत्वाला सांगितल्याचे अजित पवार म्हणाले. दरम्यान, पटेल नाराज असून शपथविधी सोहळय़ाकडे त्यांनी पाठ फिरवली.

महाराष्ट्राला सहा मंत्रिपदे

मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा चेहऱ्यांची वर्णी लागली आहे. नितीन गडकरी, पियूष गोयल यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पुन्हा संधी मिळाली. रामदास आठवले पुन्हा राज्यमंत्री झाले. प्रथमच निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली. रक्षा खडसे हा केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील महिला चेहरा असेल. तर मिंधे गटाचे प्रताप जाधव यांची राज्यमंत्रीपदावर बोळवण करण्यात आली आहे.

राणेंचा पत्ता कट, कराडांनाही संधी नाही

नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नारायण राणे यांना सूक्ष्म आणि लघुउद्योगमंत्री बनवण्यात आले होते. तेव्हा ते राज्यसभा सदस्य होते. आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर पुन्हा कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याच्या आशेवर राणे होते. मात्र मोदींनी राणेंना मोठा झटका दिला असून त्यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाकडून तसे राणे यांना कळवण्यात आले आहे. दुसरीकडे गेल्या वेळी मंत्रिपदाची लॉटरी लागलेले मराठवाडय़ातील ओबीसी नेते भागवत कराड यांनाही पुन्हा मंत्रिमंडळात संधी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात मराठवाडा आणि कोकणची पाटी कोरी राहिली आहे.