नवी दिल्लीत भाजपप्रणित एनडीएची बैठक झाली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी निवनिर्वाचित खासदारांशी संवाद साधत भाषण केले. शिवसेनेशिवाय एनडीए अपूर्ण आहे याची जाणीव महाराष्ट्रात झालेल्या दारूण पराभवानंतर आता मोदींना झाल्याचे दिसत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेला नकली म्हणणाऱ्या मोदींना अखेर बाळासाहेब ठाकरे यांचा करिश्मा दिल्लीत एनडीए आघाडीतील सर्व नेत्यांसमोर मान्य करावा लागला. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) बनून जवळपास तीन दशकं झाली आहेत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांत तीन दशकं एनडीएची आघाडी असणं ही काही सामान्य घटना नाही. विविधतेने नटलेल्या देशातील लोकशाही आणि सामाजिक रचनेत हे तीन दशक मजबुतीचा संदेश देतात. वस्तुस्थिती पाहता ही सर्वांत यशस्वी आघाडी आहे. या आघाडीने 30 वर्षांत पाच-पाच वर्षांच्या तीन टर्म यशस्वीपणे पूर्ण केल्या. ही आघाडी आता चौथ्या टर्ममध्ये प्रवेश करत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
अटलबिहारी वाजपेयी, प्रकाश सिंह बादल, बाळासाहेब ठाकरे, जॉर्ज फर्नांडिस, शरद यादव यांच्यासह अनेक नेत्यांनी एनडीएचे जे रोप लावले होते, ते आज हिंदुस्थानच्या जनतेने विश्वासाचे सिंचन करत या रोपट्याचे वटवृक्ष केले आहे. आपल्याकडे अशा महान नेत्यांचा वारसा आहे. त्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे नरेंद्र मोदी पुढे म्हणाले.