मोदी आणि ढोंग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत

Pc - Abhilash Pawar

मोदींनी गेल्या दहा वर्षांत कधीही सार्वमताची चिंता केली नाही. लोकसभेत जर त्यांना 400 जागा आल्या असत्या तर यांनी संविधान नक्कीच बदलले असते. आज त्यांनी संविधानाची प्रत डोक्याला लावली हे सर्व ढोंग आहे. मोदी आणि ढोंग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लगावला.

लोकसभा निवडणूक निकाल आणि केंद्रातील एनडीए सरकारच्या स्थापनेच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप आणि मोदींचा खरा चेहरा उघड केला. या लोकसभा निवडणुकीत संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्या भाजप नेत्यांचा पराभव झाला. फैजाबादचे खासदार लल्लू सिंग, ज्योती मिर्जा, स्मृती इराणी यांच्या तोंडीही संविधान बदलण्याची भाषा होती. भाजपला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या मायावती आणि महाराष्ट्रातील अन्य पक्षांच्या नेत्यांनाही देशातील जनतेने घरी बसवले, असे संजय राऊत म्हणाले.

या देशात लोकशाहीमध्ये सगळ्यात जास्त कायद्याचा गैरवापर करणारे कुणी असतील तर ते पंतप्रधान मोदी आणि गृह मंत्री शहा आहेत. मोदी किती ढोंगी आहेत, कॉँग्रेस जर सत्तेत आली तर ते मुस्लिमांना आरक्षण देतील, अशी त्यांनी हिंदूंना चिथावण्याची भाषा केली. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या बाजूचे आहेत. त्यांची ती भूमिका आहे. यावर हिंदुत्ववादी मोदींचे काय म्हणणे आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

ईडी, सीबीआय भाजपचे शार्प शूटर

मोदी हे मवाळ असूच शकत नाहीत. गुंड जो असतो तो टोळ्या वापरून आपल्या विरोधकांचा खात्मा करतो हे आपण पाहिले आहे. तशा यांच्या टोळ्या आहेत. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स हे यांचे शार्प शूटर आहेत. भाजपला ज्या काही जागा मिळाल्या आहेत त्यातील 100 जागांवर विजय हा या टोळ्यांच्या माध्यमातून मिळालेला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांत यांनी आतंकवाद माजवला आहे, असे संजय राऊत म्हणाले.