धुळे जिह्यातील मौजे भोईटे शिवारात सवादोन एकरांत गांजाची शेती फुलविण्यात आली होती. हा गांजा नशेबाजांना पुरविला जात होता. पण या गांजाच्या शेतीची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने त्या शेतात जाऊन तब्बल दोन हजार 816.5 किलो गांजाचा साठा जप्त केला. ही शेती करणारा मात्र फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वांद्रे युनिटचे वरिष्ठ निरीक्षक जीवन खरात, प्रभारी निरीक्षक राजेंद्र दहिफळे व पथकाने ऑगस्ट महिन्यात साकीनाका येथे एका तस्कराला गांजा विकण्यासाठी आला असता रंगेहाथ पकडले होते. तेव्हा त्याच्याजवळ 47 किलो गांजा सापडला होता. त्या तस्कराकडे चौकशीत त्याने धुळ्यात राहणारा किरण कोळी याच्याकडून घेतल्याचे समोर आले. त्यामुळे आणखी खोलात जाऊन पोलिसांनी चौकशी केली असता किरण कोळी याने शिरपूर तालुक्यातील मौजे भोईटे शिवारात सव्वा एकरामध्ये गांजाची शेती केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खरात व त्यांच्या पथकाने त्या शेतात धडक देऊन दोन हजार 774 किलो वजनाची गांजाची वनस्पती, 42.5 किलो वजनाचा सुका गांजा असा तब्बल पाच कोटी 86 लाख किमतीचा दोन हजार 816.5 किलो वजनाचा गांजा जप्त केला. पोलिसांनी गांजाची शेती उद्ध्वस्त केली. पण ही शेती करणारा किरण मात्र सापडू शकला नाही. किरण हाती लागल्यानंतर गांजाच्या तस्करीत कोण कोण सामील आहे ते समजू शकेल.