हिंमत असेल तर राणेंनी रिफायनरी स्थळी येऊन दाखवावे; विनायक राऊत यांचे थेट आव्हान

नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रिफायनरीसाठी प्रस्तावित असलेल्या बारसू गावात येऊन दाखवावे, विरोध काय असतो ते आम्ही त्यांना दाखवून देऊ, असे थेट आव्हान शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत यांनी दिले. रिफायनरी विरोधकांवर बोलणाऱया नारायण राणे यांना राऊत यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने 3 आणि 4 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या दौऱयावर येणार आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांची चिपळूणमध्ये सभादेखील होणार आहे. या पार्श्वभूमीवर विनायक राऊत यांनी आज मैदानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. रविवारी, खेड येथे बोलताना नारायण राणे यांनी कोकणात रिफायनरी प्रकल्प करणारच असल्याचे म्हटले होते. यावर खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे. गुजराती दलालांच्या हितासाठी राणे यांनी बारसूला रिफायनरी आणण्याचा प्रयत्न केला तर कोकणी माणूस कसा विरोध करतो हे ते पाहतीलच असा इशाराही राऊत यांनी दिला.

नारायण राणे म्हणजे डबल ढोलकी
मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावर नारायण राणेंनी घेतलेल्या भूमिकेवरही खासदार राऊत यांनी टीका केली. राणे हे डबल ढोलकी आहेत. त्यांच्या खासदारकीचे शेवटचे दिवस राहिले आहेत. ते पुन्हा निवडून येणार नाहीत. मराठा समितीचे अध्यक्ष असताना त्यांनी काय दिवे लावले हे सर्वांना ठाऊक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठा आरक्षणासाठी कायदा करावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह सकल मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला. मराठय़ांना स्वतंत्र आरक्षण द्यायची सरकारची खरोखर मानसिकता असेल तर भाजपने संसदेत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाबतीत कायदा करावा, असे ते म्हणाले.