नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावात दारूची बाटली अखेर आडवी झाली असून दारूबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा यात मोठा विजय झाला आहे. दारूबंदीसाठी मतदान घेण्यात आले. बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात 677 पैकी 612 महिलांनी दारूबंदीसाठी कौल दिला. त्यामुळे गावात दारूबंदी होणारच यावर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान असलोद हे दारूबंदी करणारे जिल्हय़ातील पहिले गाव ठरले आहे.
असलोद गावात महिलांकडून गेल्या अनेक वर्षांपासून दारूबंदीसाठी मागणी करण्यात येत होती. अखेर पाठपुराव्यानंतर गावात दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला. दारूमुळे अनेक कुटुंबात कलह निर्माण होत होता. गावातील तरुण व्यसनाधीन होण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अनेकांचे संसारही उद्ध्वस्त होत होते. त्यामुळे यावर उपाय म्हणून गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदीचा निर्णय घेतला. असलोद गावामध्ये महिलांच्या झालेल्या मतदानात एकूण 1216 पैकी 677 महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 612 महिलांनी आडवी बाटली म्हणजे दारूबंदीच्या बाजूने मतदान केले. तर 49 महिलांनी उभी बाटली म्हणजे दारूबंदीच्या विरोधात मतदान केले.
प्रशासनाचा मोठा बंदोबस्त
दारूबंदीसाठी रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. मतदान पेंद्रावर महिलांच्या रागांचरागा पाहायल्या मिळाल्या. त्यामुळे गावात मोठय़ाप्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. महसूल प्रशासक आणि पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी मतदान प्रक्रीयेवर लक्ष ठेवून होते. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात झाली. दारूमुळे गावातील तरुण पिढीवर परिणाम होत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी दिलेल्या लढय़ाला मोठे यश आले आहे.
उभी बाटली 49
आडवी बाटली 612
बाद मते 16