Nanded News – नांदेडमध्ये खासगी वाहनातून 12 लाख जप्त

निवडणूक आचारसंहिता सुरु झाल्यानंतर राज्य सिमेवर व जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी पोलिसांनी तपासणी नाके सुरु केले असून, भोकर येथे मध्यरात्री एका चारचाकी वाहनात 12 लाख 50 हजार रुपये सापडले आहेत. पोलिसांनी ही रक्कम जप्त करुन त्याची माहिती आयकर विभागाला दिली आहे.

नांदेड जिल्ह्यात विधानसभा व लोकसभा पोटनिवडणुकीची आचारसंहिता सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात राज्य सिमेवर व अन्य ठिकाणी तपासणी नाके नेमण्यात आले आहेत. यात महसूल, पोलीस यंत्रणेचे संयुक्त पथक असणार आहे. मध्यरात्री एक वाजता पोलिसांनी तपासणी सुरु केली असता ही चारचाकी गाडी हिमायतनगर येथून म्हैसा (तेलंगणा) कडे जात होती. ही गाडी भोकर तालुक्यातील पाळज येथील तपासणी नाक्यावर थांबविण्यात आली व त्याची चौकशी व तपासणी केली. तेव्हा या गाडीच्या पाठीमागील सिटच्या पायदानाजवळ नायलॉनची पोती होती. त्याची पाहणी करुन तपासणी केली असता त्यात 12 लाख 50 हजार रुपये आढळून आले. तपासणी पथकाने हे पैसे जप्त केले असून, आयकर विभागाकडे याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

या गाडीमध्ये विजय बाबू चव्हाण रा.कांचेली ता.किनवट, सुरेश सर्जेराव मोरे रा.छत्रपती संभाजीनगर व संतोष काशिनाथ अंभोरे रा.पेडगाव ता.सिल्लोड जि.छत्रपती संभाजीनगर असे तीन व्यक्ती होते. त्यांची सध्या चौकशी सुरु असून, पोलिसांनी सदरच्या रक्कमेची माहिती आयकर विभागाकडे दिली आहे. सदरचे पैसे कोणाचे होते, व कोणाकडे जात होते, याबद्दल तपास सुरु आहे. अद्यापपर्यंत या प्रकरणात कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही.