सुट्टीवर आलेल्या जवानाने गर्भवती पत्नी व मुलीची गळा आवळून केली हत्या

कंधार तालुक्यातील बोरी येथील सैन्य दलातील सैनिक एकनाथ मारोती जायभाये (32) याने आपली पत्नी व चिमुकल्या मुलीचा खुन केल्याची घटना आज सकाळी सहा वाजता घडली. घटनेनंतर स्वतः एकनाथ जायभाये हा पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

कंधार तालुक्यातील बोरी उमरज येथील एकनाथ मारोती जायभाये यांना आठ वर्षापूर्वी सैन्य दलात नोकरी लागली. नोकरी लागल्यानंतर त्यांचा विवाह पळसवाडी येथील भाग्यश्री सोबत झाला होता व या दाम्पत्याला एक मुलगीही होती. काही दिवसापूर्वी त्यांची बदली पठाणकोट येथे झाली. दरम्यानच्या काळात ते दहा दिवसांपूर्वी आपली पत्नी आणि मुलगी यांना सोबत घेवून गावाकडे आले होते. दि.12 सप्टेंबर रोजी त्याला परत जायचे होते. सचखंड एक्सप्रेसचे तिकीटही त्याने बुक केले होते. मात्र त्यांची पत्नी भाग्यश्री हिला ताप आल्याने तिला कंधार येथे डॉक्टरकडे दाखवून ते परत गावाकडे गेले.

दरम्यान 13 सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास एकनाथ जायभाये यांनी आपली पत्नी भाग्यश्री (23) व मुलगी सरस्वती (4) या दोघींचीही गळा दाबून त्यांचा खून केला आणि स्वतः माळाकोळी येथे पोलीस ठाण्यात हजर झाला. भाग्यश्री सध्या सात महिन्याची गर्भवती असल्याचे पोलिसांनी सांगितले. नेमका हा खुन कुठल्या कारणाने झाला याचा आम्ही तपास करीत आहोत, असे माळाकोळीचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी सांगितले.

दरम्यान भाग्यश्रीच्या कुटुंबियांनी याबाबत पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी भेट दिली तर पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मारोती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार हे करत आहेत.