शेतकऱ्यांनी केलेल्या नोंदीनुसार व वेळेवर ऊस तोडणी होत नाही. ऊसतोडणीत राजकारण होत आहे. अशी तक्रार करत नांदेडच्या सावरगाव येथील शेतकऱ्यांनी अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयातच कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याची घटना समोर आली आहे. अखेर कार्यकारी संचालक व संचालक मंडळाने आश्वासन दिल्यानंतर शेतकऱ्यांनी कर्मचाऱ्यांना सोडून दिले.
अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. भाऊराव कारखाना नोंदीप्रमाणे ऊस तोडत नाही. शेतकऱ्यांनी इतर कारखान्याना ऊस द्यायचे म्हटले, तर त्यांची यंत्रणा भाऊराव चव्हाण कारखान्याचे प्रशासन येऊ देत नाही. ऊस लागवड करून चौदा महिने उलटले आहेत. शेतकऱ्यांच्या ऊसाचे अक्षरशः चिपाड होत आहे, असा संताप शेतकरी व्यक्त करत आहेत. तर, नोंदीप्रमाणे ऊस घेऊन जाण्यासाठी सावरगाव येथील शेतकरी बालाजी आबादार कारखान्याकडे विनंती केली. गेल्या अनेक दिवसांपासून कारखान्याचे प्रशासन आणि संचालक मंडळाकडे खेटे मारूनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही. उलट शेतकऱ्यांची टिंगल संबंधित प्रशासन करत होते. संचालक मंडळाच्या संबंधातील व काँग्रेस कार्यकर्त्यांचा ऊस पुढची नोंद असतानाही तोडणी केला जात होता. त्यामुळे संतापेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यालयातच कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवले.
सावरगाव येथील संतप्त शेतकऱ्यांनी भाऊराव चव्हाण सहकारी कारखान्याचे क्षेत्रीय कार्यलयातच शेतकऱ्यांना कोंडून टाकले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव राजेगोरे, संभाजी ब्रिगेड शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकारी संचालक श्याम पाटील व संचालक मोतीराम पाटील यांनी चर्चा करून ऊस तोडणीचे आश्वासन दिल्यानंतर कार्यालयाचे बंद शटर खुले करण्यात आले.
माझा ऊस नोंदीनुसार न तोडता इतरांचा का तोडत आहात. माझा ही ऊस वेळेवर न्यावा, अशी मागणी करत असताना मशीन चालकाकडून अंगावर मशीन घातली असा संतापजनक प्रकार घडला. ऐनवेळी एका शेतकऱ्याने मला बाजूला ओढले, असा आरोप माधव किशन आबादार यांनी यावेळी केला.
ऊसाला पहिली उचल 3300 रुपये द्यावी, ऊस तोडणी वेळेवर करावी, इतर कारखान्यांना ऊस घेऊन जाण्यासाठी परवानगी द्यावी. यासह अनेक मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात कारखाना प्रशासन, साखर सहसंचालक व शेतकरी प्रतिनिधी यांच्या दोन बैठका झाल्या. पण कुठलाच तोडगा निघाला नाही. शेतकरी आता आंदोलनाच्या पवित्र्यात असून त्याचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्याचा हा फक्त नमुना आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी मध्यस्थी करून तातडीने मार्ग काढावा व शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावाम अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंत राजेगोरे यांनी दिली आहे.