दुष्काळ व पाणीटंचाईने त्रस्त जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, नाना पटोले यांचा मिंधेंना इशारा

राज्यावर भीषण दुष्काळाचे सावट पसरले असून, पाणीटंचाईने ग्रामीण भागात जगणे मुश्कील झाले आहे. अशा विपरीत परिस्थितीत मंत्री निवडणूक शिणवटा घालवण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणी, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मूळ गावी फॉर्महाऊसवर आराम करत आहेत. कारण राज्य व केंद्र सरकार शेतकरी विरोधी असून त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल,’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पैठण तालुक्यातील पाचोड व आडूळ येथे दुष्काळ पाहणी दौरा केला. यावेळी ते बोलत होते.

राज्यात भीषण दुष्काळ असून, अनेक वर्षे मुलाबाळा प्रमाणे सांभाळ केलेल्या शेकडो हेक्टरवरील मोसंबी व डाळींब बागा दुष्काळात होरपळून जात आहेत. दुसरीकडे पिण्याच्या पाण्यासाठी आबालवृद्धांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. अशा बिकट परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने नागरिकांना कोणत्याच प्रकारचा दिलासा दिला नाही. राज्याचे कृषी मंत्री अभ्यास दौरयाच्या नावावर विदेशवारी करीत आहेत. तर मुख्यमंत्री त्यांच्या मूळ गावी आराम करीत आहेत आहेत, असेही कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. दुष्काळ पाहणी दौरा दरम्यान कोळी बोडखा व आडूळ (ता. पैठण) येथे आज त्यांनी पाहणी केली. आडूळ येथील अप्पासाहेब कोल्हे व नंदू जारे यांच्या शेतात तर कोळीबोडखा येथे एजाज पटेल यांच्या शेतात जाऊन पाण्याअभावी जळालेल्या मोसंबी बागेसह रोपवाटिकांची पाहणी केली. लोकसभेचे जालना मतदारसंघाचे उमेदवार डॉ. कल्याण काळे, वजाहिद मिर्झा, माजी आमदार नामदेव पवार, किरण डोणगावकर, विलास औताडे व अनिल पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

जायकवाडी असताना पाणीटंचाई ? हे दुर्दैवच!

यावेळी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, ‘पैठण तालुक्यात आशियातील सर्वात मोठे मातीचे धरण असूनही येथील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पिण्याच्या पाण्यासाठी १०४ टँकर्स पाणीपुरवठा करत असल्याचे ऐकून मला आश्चर्य वाटले. हे दुर्दैव असून, ‘हर घर नल… हर घर जल’ ही योजना अजूनही कागदावरच आहे. हे सर्व पाहता केंद्र व राज्य सरकारचे दिवस भरले असल्याचे दिसत आहे. मिंधे सरकारविरुद्ध खूप रोष आहे. दुष्काळात होरपळून निघणार्‍या तालुक्यातील शेतकर्‍यांना कोणत्याही प्रकारची मदत सरकारकडून करण्यात आली नाही. उलट बँका वसुलीसाठी तगादा लावीत आहेत. शेतकर्‍याचे प्रचंड नुकसान होत असताना राज्याचे मस्तवाल मंत्री अभ्यास दौर्‍यावर आहेत. त्यामुळे जनताच केंद्रात येत्या ४ तारखेला सत्ता बदल करणार आहे. तर राज्यातील मस्तीखोर सरकारलाही खाली खेचणार आहे. असा इशारा दिला. यावेळी अनिस पटेल ,भाऊसाहेब पिवळ, दत्तूकाका ठोंबरे, शुभम पिवळ, सरपंच बबन भावले, जब्बार शेख, शिवलाल राठोड, रामूनाना पिवळ, डॉ. नंदू वाघ, आजीम शेख, सुधाकर पिवळ, हाजी शेख, उपसरपंच अनिल मोरे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

शेतकर्‍यांनी मांडली कैफियत

नाना पटोले हे पाहणी करीत असताना येथील अनेक शेतकरी व ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढा वाचत कैफियत मांडली. शेतकर्‍यांनी सांगितले की आम्ही खरीप व रब्बीचा विमा भरला असताना नुकसान भरपाई मिळाली नाही. दुष्काळात आमच्या बागा वाळल्या. तर अवकाळीने दोन्ही हंगामीतील पिकांचे अतोनात नुकसान केले. यातून लागवड खर्च ही निघाला नाही. बँकांनी पीककर्जासाठी ही सिव्हीलची अट टाकली. त्यात अनेक शेतकरी अपात्र झाले तरी थकबाकीदार शेतकरयांचे वसुलीसाठी खाते होल्ड (बंद) केल्याने इतर अनुदानाचे पैसे ही काढता येत नाहीत. त्यामुळे जीव देण्याची वेळ आली आहे, असे भावनिक उद्गार यावेळी उपस्थित शेतकर्‍यांनी काढले. तेव्हा नाना पटोले यांनी कोणीही खचून न जाता आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नका. आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वांना न्याय मिळवुन देण्यासाठी सक्षम आहोत, असा दिलासा दिला.