महाराष्ट्रातील निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध सत्ताधारी महायुती असा थेट संघर्ष असताना भाजपकडून ‘देवाभाऊ’ मुख्यमंत्री होणार असल्याचे चित्र रंगविले जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थकांकडूनदेखील पद्धतशीरपणे मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांच्या नावाची चर्चा घडवून आणली जात आहे. अशातच भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी, भाजपमध्ये ज्या नावाची चर्चा ती व्यक्ती कधीच मुख्यमंत्री होत नाही, असे स्पष्ट करत फडणवीसांची कन्नी कापली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे तसा प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. प्रचार फेऱया, रोड शो, जाहीर सभांतील भाषणे आणि शक्तिप्रदर्शन यामुळे दिवसेंदिवस निवडणुकीला रंग चढत आहे. भाजप, शिंदे आणि अजित पवार गट या महायुतीमधील प्रमुख पक्षांकडून आपापल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केले जात आहे. भाजप आणि फडणवीस समर्थकांकडून ‘देवाभाऊ’ अशी बॅनरबाजी केली जात आहे. त्यातच भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे यांनी मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱयाबाबत सूचक वक्तव्य केले आहे.
तावडे नेमके काय म्हणाले?
पत्रकार परिषदेत विनोद तावडेंना पत्रकारांनी ‘2024 च्या विधानसभा निवडणुकाRचे निकाल आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर तावडेंनी, महायुती जिंकेल आणि महायुतीचा मुख्यमंत्री होईल, असे उत्तर दिले. त्यावर पत्रकारांनी, मुख्यमंत्रीपदासाठी तुमच्या नावाची पण चर्चा होतेय असे विचारताच तावडे म्हणाले, भाजपमध्ये ज्या नावाची चर्चा होते ते कधी मुख्यमंत्री होत नाहीत हे पक्के लक्षात ठेवा. काही काळजी करू नका. तुम्हाला राजस्थानचे भजनलाल शर्मा माहिती होते?, मोहन यादव माहिती होते? ओडिशाचे माहिती होते का? त्यामुळे माझ्या नावाची चर्चा झाली ना? याचा अर्थ मी नक्की होणार नाही हे ठरवा. बाकी बघू असं म्हणत तावडे पुढल्या प्रश्नाकडे वळले.